लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
90 च्या दशकात एक मराठी चित्रपट प्रसारित झाला होता. त्या चित्रपटातलं एक दृश्य आज सहज आठवलं. त्या चित्रपटातल्या मुख्यमंत्र्याला त्याच चित्रपटातले पत्रकार सातत्यानं एकच प्रश्न विचारत असतात, मुख्यमंत्री साहेब, बबन कांबळेचं काय झालं? हा बबन कांबळे कसा गायब झाला? त्याला कोणी गायब केलं? त्याचा घातपात झाला का? असे अनेक प्रश्न त्या चित्रपटातल्या पत्रकारांना पडले होते. अगदी तशीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमचा जाहीर सवाल आहे, की देवाभाऊ, खरंच सांगा, कृष्णा आंधळेचं काय झालं? तुमचे पोलीस कधी करणार आहेत त्याला जेरबंद?
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता तीन महिने पूर्ण झाले आहेत. कुठल्याही गंभीर गुन्ह्याचं दोषारोपपत्र (चार्जशीट) 90 दिवसानंतर न्यायालयात सादर करावं लागतं. मयत सरपंच देशमुख यांच्या हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र नुकतंच सादर केलंय. योगायोग म्हणजे याच दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रात सरपंच देशमुख यांच्या हत्येविषयी हळहळ व्यक्त करण्यात आली.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातला एक आरोपी वगळता सर्वच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. हा एक आरोपी म्हणजे कृष्णा आंधळे. सरपंच देशमुख यांच्या हत्येची घटना घडल्यापासूनच कृष्णा आंधळे फरार आहे. अर्थात तो नक्कीच फरार झाला आहे, की त्याला कोणी तरी फरार केलंय, हादेखील महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला ज्वलंत प्रश्न आहे. कृष्णा आंधळेचा घातपात झालाय का, अशी शंकासुद्धा अनेकांनी व्यक्त केली आहे.
सर्वात मुख्य आणि गंभीर प्रश्न असा आहे, की तीन महिन्यांच्या कालखंडामध्ये पोलिसांना एकटा कृष्णा आंधळे का सापडू शकला नाही? पोलीस नक्की कुठं कमी पडले? कृष्णा आंधळे विदेशात पळून गेलाय का? पोलिसांनी त्याला फरार घोषित केलंय का? कृष्णा आंधळेला फरार घोषित केलं असल्यास त्याच्याविरुद्ध ‘लुक आऊट’ नोटीस जारी करण्यात आली आहे का? कृष्णा आंधळेला नक्की कोण वाचविण्याचा प्रयत्न करत आहे? हे आणि असे सारे प्रश्न आणखी किती दिवस अनुत्तरीत राहणार, हादेखील मोठा प्रश्न असून राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यात आजमितीला तरी असमर्थ असल्याचं दिसत आहे.
काही जाणकार लोकांच्या मतांनुसार कृष्णा आंधळेचा जर घातपात झाला असेल तर किमान त्याचा मृतदेह कुठं तरी आढळून यायला हवा होता. मात्र ९० दिवसांत तसं काहीही झाल्याचं आढळून आलं नाही. देव करो, कृष्णा आंधळे सुस्थितीत राहो आणि तो लवकरात लवकर पोलिसांच्या हाती लागो, हीच अपेक्षा महाराष्ट्राची जनता व्यक्त करत आहे. कारण कृष्णा आंधळे हा संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातला एक महत्त्वाचा दुवा असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळेच राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
यांना जाता जाता पुन्हा तोच प्रश्न, मुख्यमंत्री साहेब, कृष्णा आंधळेचं नक्की काय झालंय?