संपादकीय…!
बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यात असलेल्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच मयत संतोष देशमुख यांच्या हत्येला आता १७ दिवस उलटून गेले आहेत. मात्र या भयानक आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या हत्याकांडातल्या सर्वच आरोपींना अद्यापपर्यंत अटक करण्यात आलेली नाही. या हत्याकांडाचे ‘मास्टरमाईंड’ ज्यांना म्हटलं जातंय, ते वाल्मिक कराड कुठं लपले आहेत? हा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडला आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून फक्त एवढंच मला असं वाटतं, ‘देवाभाऊ! ये पब्लिक हैं…! ये सब कुछ जानती हैं…! अवघा महाराष्ट्र कधी मिळणार देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय?
या आणि अशा अनेक प्रश्नांनी हैराण झाला आहे. या संदर्भात येत्या 28 जानेवारी रोजी विरोधकांकडून भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र तत्पूर्वीच कराड यांना पोलिसांनी अटक करायला हवी आहे. परंतु त्या दृष्टीने कुठल्याही प्रयत्न आतापर्यंत तरी करण्यात आलेले नाहीत.
आमदार सुरेश धस म्हणतात, मयत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या. मंत्री धनंजय मुंडे म्हणतात, गुन्हेगार किती जवळचे असले तरी त्यांना फासावर लटकवा. मग आता राज्याचं सरकार हे प्रकरण सीआयडीकडे सोपवून झुरळाला झटकून टाकल्यासारखं जबाबदारी झटकत नाही का? खरं तर संतोष देशमुख यांच्या हत्येचा खटला द्रुतगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) चालविण्याची गरज आहे. दुर्दैवानं त्या संदर्भातदेखील काहीच हालचाली होताना दिसत नाहीत.
महायुतीचं राज्यातलं सत्ताधारी सरकार नक्की कोणाला घाबरतंय? कोणाला पाठीशी घालतंय? मग संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांचा ‘आका’ जो कोणी असेल किंबहुना जो कोणाच्या कितीही जवळचा असेल तरी त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असं सातत्यानं सांगितलं जात आहे. पण मग हे प्रत्यक्षात होणार तरी कधी? सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण सत्ताधारी महायुतीला अजिबात हलक्यात घेता येणार नाही. कारण या प्रकरणावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. यामध्ये महायुती सरकारकडून जर ‘उन्नीस बीस’ झालं तर पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीच्या सर्वांनाच विरोधी बाकावर बसावं लागणार आहे, यात कसलीही शंका नाही.