बाळासाहेब शेटे पाटील
लोकपत न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
विधानसभा निवडणुकीत भाजपला जास्तीत जास्त जागा मिळाल्यानं मुख्यमंत्री पद भाजपकडेच असावं, अशी मागणी केली जात आहे. मात्र दुसरीकडे ज्यांच्या नेतृत्वाखाली सत्ता मिळाली, ते एकनाथ शिंदे
नाराज होणार नाहीत ना, याचीही काळजी घेतली जात आहे. दरम्यान, अजित पवार
यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड होण्यास एका अर्थाने संमतीच दिली जात आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलेल्या या भुमिकेमुळे शिवसेनेच्या शिंदे गटाची घासाघीस मात्र चांगलीच निष्प्रभ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची देवेंद्र फडणवीस
यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती का आहे, याची अनेक कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची मैत्री आहे. 2019 मध्ये या दोघांनी भल्या पहाटे शपथविधी घेऊन सरकार स्थापन केलं होतं. मात्र ते फार काळ टिकलं नाही. त्यानंतर 2023 मध्ये अजित पवार थेट महायुतीत सामील झाले.
विधानसभेची निवडणूक होऊन तीन दिवस झाले तरीही सरकार अस्तित्वात येत नाही, याची कारणं काय आहेत, यामुळे महायुतीमध्ये काही बेबनाव आहे का, 2019 च्या पहाटेच्या अशा शपथविधीची पुनरावृत्ती तर होणार नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत.
केंद्रात मंत्री पद किंवा उपमुख्यमंत्री पद असा फार्म्युला देण्यात आला आहे का, तीन दिवसानंतरदेखील मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय का झाला नाही, हे देखील मुद्दे राज्यभरात चर्चिले जात आहेत. दरम्यान, आमचा सत्तेसाठी हव्यास नव्हता तर महाविकास आघाडीच्या तावडीतून महाराष्ट्राला वाचवायचं होतं. यासाठी आमचे प्रयत्न होते. महायुतीचाच मुख्यमंत्री होणार आहे. मात्र चर्चा होऊन अधिकृत पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्याची घोषणा केली जाणार असल्याचं भाजपच्या सहप्रवक्त्यांनी सांगितलंय.