लोकमत न्यूज नेटवर्क / बीड प्रतिनिधी
बीडच्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागे जो ‘आका’ अर्थात वाल्मीक कराड आहेत, त्या ‘आका’चा बाप मंत्री धनंजय मुंडे हेच असून त्यांना मंत्रीमंडळातून तात्काळ हाकलून लावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी केलीय. बीडमध्ये काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चात आव्हाड बोलत होते.
आव्हाड म्हणाले, दोन कोटी रुपयांची खंडणी ही गणपतीच्यासाठी वर्गणी मागण्यात आलेली नव्हती. तर त्यावेळी निवडणुका सुरू होत्या आणि निवडणूक निधी म्हणून दोन कोटी रुपये मागण्यात आले. मात्र ते न दिल्याने सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली.
आव्हाड पुढे म्हणाले, मी वंजारी असूनही या मोर्चात मुद्दामपणे सहभागी झालो. कारण जातीसाठी मागे हटायचं नसतं. माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलं असेल तर मी माझ्या राजकारणाचा अजिबात विचार करणार नाही. संतोष देशमुख यांच्या हत्येला जे जे जबाबदार आहेत, त्या सर्वांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.
बीडमधून चक्क एक कलेक्टर गेल्या अनेक वर्षांपासून गायब आहे. पोलीस आणि या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी बीडचं वाटोळं केलं आहे. पालकमंत्र्यासमोर कलेक्टर तरी काय बोलणार, असा प्रश्न उपस्थित करून या प्रकरणात देशमुख कुटुंबियांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा निर्धार आव्हाड यांनी बोलून दाखवला.