लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
अहिल्यानगर महापालिकेत हजारो कर्मचारी कार्यरत आहेत. यापूर्वी या महापालिकेचा प्रसिद्धी विभाग या महापालिकेचे कर्मचारीच पाहत होते. अतिशय उत्कृष्टपणे हा प्रसिद्धी विभाग सुरु होता. मात्र अलीकडे या महापालिकेमध्ये प्रसिद्धीसाठी खासगी संस्था नेमण्यात आल्याची माहिती पत्रकारितेतल्या आमच्याच एका सहकारी मित्रानं आम्हाला दिली आहे.
‘अश्विन’ नावाचा एक इसम हे सारं काम पाहत आहे. कर्मचारी संख्या अपुरी असल्यानं प्रसिद्धीसाठी खासगी संस्थेला हे काम देण्यात आलं असल्याचं वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत, अशी माहिती आमच्या सहकारी पत्रकार मित्रानं दिली. यावर खर्च होणारा पैसा या शहरातल्या व्यापारी आणि नागरिकांच्या कष्टाचा आहे, हे विसरुन कसं चालेल?
अहिल्यानगर (अहमदनगर) महापालिकेचा प्रसिद्धी विभाग यापूर्वी निलिमा बंडेलू, रिजवान शेख, शशिकांत (बाळासाहेब) नजन, कोंडा अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्कृष्ट आणि यशस्वीपणे पाहिलेला आहे.
नगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध होणाऱ्या विविध वर्तमानपत्रांत छापून आलेल्या बातम्यांची कात्रणं काढून त्या कात्रणांची फाईल तयार करण्याचं काम यापूर्वी इमानेइतबारे केलं जायचं. या महापालिकेत आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या बातम्या सर्व वृत्तपत्रांच्या कार्यालयांत विनातक्रार पोहोच व्हायच्या. अगदी अलीकडच्या काही दिवसांमध्ये अहिल्यानगर महापालिकेच्या प्रसिद्धी विभागाचा कारभार सुरळीत सुरु असताना अचानक अलीकडच्या काही दिवसांमध्ये प्रसिद्धी विभागाचं कामकाज पाहण्यासाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्याची गरज का पडली, हा प्रश्न उपस्थित झाला असून राज्याचे नगर विकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अहिल्यानगर महापालिकेच्या मनमानी कारभाराची झाडाझडती कधी घेताय, असा प्रश्न तमाम नगरकरांच्यावतीनं आम्ही विचारत आहोत.
अहिल्यानगर महापालिकेच्या माध्यमातून या शहरातल्या नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कोट्यवधी रुपयांचा निधी देत असतं. या निधीबरोबरच या शहरातल्या व्यापारी आणि नागरिकांकडून गोळा होणाऱ्या संकलित करांच्या माध्यमातून जमा होत असलेल्या करोडो रुपयांच्या खर्चातून ही कामं होत असतात. अर्थात यासाठी कोणाचा आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही. परंतू अहिल्यानगर महापालिकेत हजारो पात्रता असलेले कर्मचारी उपलब्ध असताना महापालिकेची प्रसिद्धी करण्यासाठी खासगी संस्थेला पायघड्या कशासाठी घातल्या जात आहेत, या प्रश्नाचं उत्तर अहिल्यानगर महापालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांकडे तरी आहे का, हाच खरा प्रश्न आहे.
… तर मग अशी आर्थिक उधळपट्टी कशासाठी?
महापालिकेत कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैशांची अडचण सांगणाऱ्या अहिल्यानगर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ही जी मनमानी सुरु आहे, महापालिकेचा कारभार ठेकेदारांच्या भरवशावर करण्याची ही जी पद्धत आहे, ती खूप घातक आणि खर्चिक आहे. इथल्या व्यापारी आणि नागरिकांच्या कष्टाच्या पैशांची उधळपट्टी करण्याचा अधिकार या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कोणी दिला? कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैसे नाहीत, अशी कारणं सांगणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पैशांची ही उधळपट्टी कशासाठी, याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची हिंमत नगरकर दाखवतील का, हेच आता पहायचं आहे.