लोकपत न्यूज नेटवर्क / नागपूर / वृत्तसंस्था
नागपुरात दोन गटांमध्ये संघर्ष उफाळल्यानंतर शहरात दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. या हिंसाचारामागे मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (MDP) चे शहराध्यक्ष फहीम खान असल्याचे नागपूर पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
पोलिस तपासात समोर आलं आहे की, मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (MDP) चे शहराध्यक्ष फहीम खान यांच्या नेतृत्वाखाली पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. दाखल झालेल्या तक्रारीनुसार, जमावाने अंधाराचा फायदा घेत महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा विनयभंग करण्याचाही प्रयत्न केलाय.

दरम्यान, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गांधी गेटजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर औरंगजेबाच्या थडग्याचा प्रतीकात्मक पुतळा जाळला, ज्याचा निषेध करण्यासाठी फहीम खान यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

या जमावाने शहरात दहशत निर्माण करण्यासाठी दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळ केली. त्यांच्याकडे कुऱ्हाडी, दगड, काठ्या आणि इतर धोकादायक शस्त्रे होती. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण करून नागपुरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
