लोकपत न्यूज नेटवर्क / नेवासा प्रतिनिधी
नेवासे तालुक्यातल्या सोनईनजिकच्या खरवंडी आणि कांगोणी या दोन्ही परिसरात रौंदळवस्तीजवळ गट नंबर 275 99 आर या सरकारी ग्रीन झोनमध्ये असलेल्या ओढ्यातून गेल्या अनेक दिवसांपासून रात्रंदिवस बेसुमार वाळू उपसा सुरु आहे. ही जागा सरकारच्या मालकीची असल्याचं स्थानिक ग्रामस्थांचं म्हणणं आहे. या संदर्भात एका जागरुक ग्रामस्थानं अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात
नुकतंच निवेदन दिलं आहे. दरम्यान, हा मुद्दा नागपूरला होणाऱ्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात गाजणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
संबंधित ग्रीन झोनच्या शेजारी भोगे आडनावाच्या इसमाची गट नंबर 232/ 4 या ठिकाणी 61 आर जमीन आहे. मात्र या इसमाने भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन हा ग्रीन झोन गट नंबर 275 स्वतःच्या मालकीचं भासवून मनमानी पद्धतीने बेकायदा वाळू उपसा सुरु केल्याच्या ग्रामस्थांच्या खासगीतल्या तक्रारी आहेत. शनिशिंगणापूरमध्ये राहणाऱ्या एका तरुणानं या वाळू उपशाचं काम सुरु केलं असल्याची चर्चा आहे.
या परिसरातच गट नंबर 274 असून त्याची सखोल चौकशी करण्यात यावी. तसंच या परिसरात असलेल्या वस्ती आणि शेतावर जाणारा रस्तासुद्धा या बेकायदा वाळू वाहतुकीमुळे अतिशय खराब झाला आहे. या रस्त्यावर सर्वत्र वाळू विखुरलेली आहे.
दरम्यान, खरवंडी ग्रामपंचायत, स्थानिक ग्रामस्थ आणि जिल्हा प्रशासन या सर्वांची संबंधित ग्रीन झोन संदर्भात जोपर्यंत शहानिशा होत नाही, तोपर्यंत या ठिकाणच्या वाळू उपसा प्रक्रियेला तात्काळ स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी या निमित्तानं केली जात आहे.
महसूल यंत्रणा चांगलीच लागलीय कामाला…!
लोकपत न्यूज नेटवर्कनं नेवासे तालुक्यातल्या या वाळू उपशासंदर्भात दिलेल्या बातमीने महसूल यंत्रणेत चांगलीच खळबळ उडाली आहे. रविवारचा सुट्टीचा दिवस असूनदेखील संबंधित जागेचा पंचनामा करण्याच्या सूचना मंडल अधिकाऱ्यांनी तलाठ्याला दिल्या असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे. एकूणच या बातमीमुळे नेवाशाची महसूल यंत्रणा चांगलीच कामाला लागली असल्याचं दिसत आहे.