लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर / प्रतिनिधी
नेवासे तालुक्यातल्या सोनईनजिकच्या खरवंडी आणि कांगोणी या दोन्ही परिसरात रौंदळवस्तीजवळ गट नंबर 275 99 आर या सरकारी ग्रीन झोनमध्ये असलेल्या ओढ्यातून गेल्या अनेक दिवसांपासून रात्रंदिवस बेसुमार वाळू उपसा सुरु आहे. ही जागा सरकारच्या मालकीची असल्याचं स्थानिक ग्रामस्थांचं म्हणणं आहे. या संदर्भात एका जागरुक ग्रामस्थानं अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात
दि. 12 डिसेंबर रोजी एक निवेदन दिलं आहे.
या निवेदनात म्हटलं आहे, की संबंधित ग्रीन झोनच्या शेजारी भोगे आडनावाच्या इसमाची गट नंबर 232/ 4 या ठिकाणी 61 आर जमीन आहे. मात्र या इसमाने भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन हा ग्रीन झोन गट नंबर 275 स्वतःच्या मालकीचं भासवून मनमानी पद्धतीने बेकायदा वाळू उपसा सुरु केल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. या परिसरातच गट नंबर 274 असून त्याची सखोल चौकशी करण्यात यावी. तसंच या परिसरात असलेल्या वस्ती आणि शेतावर जाणारा रस्तासुद्धा या बेकायदा वाळू वाहतुकीमुळे अतिशय खराब झाला आहे. या रस्त्यावर सर्वत्र वाळू विखुरलेली आहे.
दरम्यान, खरवंडी ग्रामपंचायत, स्थानिक ग्रामस्थ आणि जिल्हा प्रशासन या सर्वांची संबंधित ग्रीन झोन संदर्भात जोपर्यंत शहानिशा होत नाही, तोपर्यंत या ठिकाणच्या वाळू उपसा प्रक्रियेला तात्काळ स्थगिती देण्यात यावी.