लोकपत न्यूज नेटवर्क / मुंबई
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात हल्ली काहीच रस उरलेला नाही, अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. कारण राज्याच्या राजकारणात वेगवेगळी परिस्थिती निर्माण होत आहे. या परिस्थितीवर नेत्यांची वेगवेगळी वक्तव्यं येत आहेत. मात्र ही वक्तव्यं ‘मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखा कर’, अशा पद्धतीनं असल्याचं जाणवत आहे.
राज्याच्या राजकारणातले मोठे नेते असलेल्या शरद पवार यांनी आज (दि. २४) एक मोठं वक्तव्य केलं. नैतिकता, आत्मसन्मान असला तर ‘ते’ मंत्रीपदावर राहणार नाहीत, असं वक्तव्य पवार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भात बोलताना केलं. शरद पवारांचं ‘ते’ वक्तव्य तसं पाहिलं तर बरंचसं बोलकं आहे.
मुख्य प्रश्न हा आहे, की मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना खरंच न्याय मिळेल का? या गुन्ह्यातला कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही. सरपंच देशमुख यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या तपास यंत्रणेला कृष्णा आंधळे का सापडत नाही? तपास यंत्रणेने कृष्णा आंधळेला फरार घोषित का केलं नाही? कृष्णा आंधळेला अटक न करण्यासाठी तपास यंत्रणेवर कोणाकोणाचा दबाव आहे? या गुन्ह्यचा तपास करणाऱ्या तपास यंत्रणा कृष्णा आंधळे याला मोकाटच सोडणार आहेत का? या आणि अशा प्रश्नांची उत्तरं राज्यातल्या जनतेला कधी मिळणार आहेत?
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिने होत आले आहेत. या हत्याकांडावरुन मस्साजोग ग्रामस्थांच्या भावना तीव्र आहेत. या हत्येमागे मंत्री धनंजय मुंडे यांच्या मर्जीतल्या वाल्मीक कराडचा संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हत्याकांडातले कृष्णा आंधळे सोडला तर सर्वच आरोपी अटकेत आहेत. या हत्याकांडावरुन टिकेचे लक्ष झालेले मंत्री धनंजय मुंडे यांना नैतिकतेच्या मुद्द्यावरुन मंत्री पदावर राहता येणार नाही, अशा प्रकारची वक्तव्यं अनेकांनी केली आहेत. त्यामध्ये आता राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीदेखील उडी घेतली असल्याचं पाहायला मिळत आहे. हे सारं ठीक आहे. पण मग या हत्या प्रकरणाच्या तपासाची दिशा नेमकी काय आहे, हेदेखील या राज्यातल्या जनतेला समजलं पाहिजे.
सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाचा तपास थंडावला…?
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या तीन महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली. अतिशय निर्दयीपणे सरपंच देशमुख यांना मारण्यात आलं. विशेष म्हणजे सरपंच देशमुख यांचा मृत्यू झाल्यानंतर देखील त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली. दोन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणातून ही अमानुष हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. ही हत्या करणारे जवळपास सर्वच आरोपी अटकेत असले तरी कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरारच आहे. आंधळे याच्या अटकेसाठी तपास यंत्रणेकडून जे प्रयत्न व्हायला पाहिजे, तसे प्रयत्न सध्या होताना दिसत नाहीत. या प्रकरणाच्या तपासाला एक प्रकारची मरगळ आली आहे. अशा परिस्थितीत या प्रकरणाचा तपास थंडावला असल्याची शंका सध्या व्यक्त केली जात आहे.