लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदू बांधवांचा अतोनात छळ होत आहे. हिंदूंची मंदिरे जाळणं, मंदिरातल्या मूर्ती तोडणं, हिंदू धर्मातल्या मुली आणि महिलांवर बलात्कार करणं अशा प्रकारचे माणुसकीला काळीमा फासणारे प्रकार सुरु आहेत. बांगलादेशी धर्मांध लोकांना धडा शिकविण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशात ‘सर्जिकल स्ट्राईक’ करावं, अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषदेचे जिल्हाध्यक्ष अमोल कोठारी यांनी व्यक्त केलीय. यासंदर्भात कोठारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन दिलं आहे.
या निवेदनात म्हटलं आहे, की बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदू बांधव शांततेत जीवन जगत आहेत. हिंदू धर्माप्रमाणे पूजा पाठ करत आहेत. धर्मांध शक्तीला हे सहन होत नाही. त्यामुळे बांगलादेशातल्या अल्पसंख्यांक हिंदू बांधवांवर अमानुष अत्याचार केले जात आहेत.
पाकिस्तानकडूनही भारताला बराच त्रास देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानमध्ये आपलं सैन्य पाठवून अचानक ‘सर्जिकल स्ट्राईक’ केलं होतं. त्याच पद्धतीने बांगलादेशात सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज आहे.
अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना देण्यात आलेल्या या निवेदनावर अमोल कोठारी यांच्यासह दक्षिण महाराष्ट्राचे अध्यक्ष विवेक तवले, अहिल्यानगरचे शहराध्यक्ष राजू अनमल, रमेश माने, रमजान सय्यद, पप्पू पाचरणे, धनवान दिघे, अनिल नगरकर आदींच्या सह्या आहेत.