लोकपत न्यूज नेटवर्क / पुणे / प्रतिनिधी
पुण्यातल्या नॅशनल डिफेन्स अकॅडमी NDA लगतच्या खासगी भूखंडावर (दि. ९) वाढदिवसाचं औचित्य साधून पूर्वपरवानगीशिवाय आयोजित करण्यात आलेल्या पार्टीमुळे स्थानिक नागरिकांना रात्रभर झोप आली नाही. त्यामुळे शेकडो नागरिकांनी बावधन पोलीस ठाण्यात धाव घेतली. या पार्टीत प्रसिद्ध गायक शंकर महादेवन आणि त्यांचा मुलगा शिवम महादेवन यांच्या गायनाचा कार्यक्रम होता. संतप्त नागरिकांनी या कार्यक्रमाविरोधात पोलिसांना तक्रार दिली.
विशेष म्हणजे पहाटे साडेपाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. आवाजाचा त्रास जाणवू लागल्याने अनेकांनी 112 क्रमांकावरून पोलिसांना फोन केला. मात्र पोलिसांनी दखल घेतली नाही, असा आरोप केला जात आहे. या कार्यक्रमातल्या गाण्यांचे व्हिडिओ तयार करून नागरिकांनी पोलिसांनादेखील पाठवले. मोठमोठ्या लोकांचा कार्यक्रम असल्याने पोलीस हातबल झाले असावेत, अशीच चर्चा या निमित्ताने ऐकायला मिळत आहे.
दरम्यान, या प्रकरणी ध्वनीप्रदूषण झाल्यामुळे संबंधितांविरुद्ध बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. झोन 2 चे पोलीस आयुक्त विशाल गायकवाड यांनी यासंदर्भात सांगितलं, की नागरिकांच्या तक्रारीचे निवेदन घेण्यात आलं असून ध्वनीप्रदूषण केल्याबद्दल संबंधितांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे.