लोकपत न्यूज नेटवर्क / नेवासा / प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांच्या मदतीने नेवासा तालुक्यातला आमदार बदलण्याचे काम प्रामाणिकपणे कार्यकर्त्यांच्यावतीने करण्यात आले. नुकताच या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा आभार सोहळा पार पडला. नेवासा शहर येथे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते ऋषिकेश भाऊ शेटे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भाजप सदस्य नोंदणी अभियानांतर्गत आज एक बैठक घेण्यात आली.
बैठकीदरम्यान उपस्थित प्रश्नांमध्ये कार्यकर्त्यांनी आपले मत व्यक्त केले, की तालुक्यात असे असंख्य कार्यकर्ते आहेत, की त्यांनी काही कारणांमुळे बंडखोरी करून बंडखोर नेत्याचे काम केले. त्यांची केलेली चूक आता त्यांच्या लक्षात आली असून इथून पुढे ते कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत काम करण्यासाठी इच्छुक आहेत.
दरम्यान, असा प्रस्ताव या बैठकीत मानण्यात आला यावर सविस्तर सर्व पदाधिकाऱ्यांची चर्चा होऊन चर्चेअंती भारतीय जनता पार्टीचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील बोलताना म्हणाले, की आपण बंडखोर प्रमुख नेते सोडून इतर सर्व सामान्य कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊ. उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांचा लवकरच भारतीय जनता पार्टीत समावेश करून घेणार आहोत. भारतीय जनता पक्ष तालुक्यात सक्षम करणार असून कार्यकर्त्यांच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा राहणार आहे.
लवकरच काही वाट चुकलेल्या फक्त कार्यकर्त्यांनाच भारतीय जनता पार्टीचा मेळावा घेऊन भारतीय जनता पक्ष मजबूत करून त्यांना पक्षांमध्ये अधिकृत सामावून घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, तालुक्यातील सर्व ग्रामपंचाती, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टी व महायुतीचा झेंडा पूर्ण ताकदीने कसा फडकेल, यासाठी प्रयत्न करणार आहोत.
लवकरच तालुकाभर सदस्य नोंदणी अभियान राबवणार असल्याचे युवा नेते ऋषिकेश शेटे यांनी सांगितलं. ते म्हणाले, की आपल्याला सर्व तालुका पातळीवर सर्व बुथ सशक्तीकरण अभियान अंतर्गत सदस्य नोंदणी अभियान व विरोधी गटात काम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांचा लवकरच प्रवेश होणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.
भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला कोणाकडूनही त्रास होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाईल. पक्ष मजबूत व पक्ष वाढीसाठी गावस्तरावर भारतीय जनता पार्टीच्या शाखा स्थापना ही लवकरच तालुकाभर करण्यात येईल. या बैठकीदरम्यान अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यापुढे सर्व एकजुटीने एक विश्वासाने काम करूया आणि भारतीय जनता पार्टी पक्ष मजबूत करू. यासाठी सर्वानुमते बैठकीत निर्णय करण्यात आला. लवकरच नेवासा भारतीय जनता पार्टीची नूतन नवीन कार्यकारणीची ही घोषणा होणार असल्याचेही युवा नेते ऋषिकेश शेटे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष रोहित पवार, व्यापारी सेलचे तालुकाध्यक्ष राजेंद्र मुथा, शहर उपाध्यक्ष शंकर कंनगरे, शिवसेनेचे विधानसभा प्रमुख भाऊसाहेब वाघ, नगरसेवक इंजिनीयर सुनील वाघ, शिवसेनेचे शहराध्यक्ष बंडू शिंदे, भाजप प्रसिद्धी प्रमुख आदिनाथ पटारे, सचिन भांड, अनिल परदेशी, निखिल जोशी, बाळासाहेब क्षीरसागर, विवेक ननवरे, महेश लोखंडे, प्रतीक शेजुळ, आकाश देशमुख, नाना शेंडे, गोरक्षनाथ बेहले आदींसह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.