संपादकीय…!
भारतात ज्या पद्धतीनं मुस्लिम बांधव अल्पसंख्यांक म्हणून ओळखले जातात, त्याच पद्धतीनं बांगलादेशात हिंदूंना अल्पसंख्याक म्हणून ओळखलं जातं. मात्र भारतात मुस्लिम हे शत्रू नसून त्यांना मित्र आणि बांधव म्हणून संबोधलं जातं. ‘हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हम सब हैं भाई भाई’, अशी शिकवण भारतात प्रत्येकाला दिली जाते. बांगलादेश आणि भारतात हाच काय तो फरक आहे.
मात्र अलीकडच्या काळात बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूंवर अमानवी अत्याचार करण्यात येत आहेत. भारतात प्रत्येक धर्माला सन्मान दिला जातो. प्रत्येक धर्माचे लोक त्यांच्या धर्माचा प्रचार करू शकतात. बांगलादेशात मात्र हिंदूंना त्यासाठी मज्जाव केला जात आहे. त्यामुळेच बांगलादेशचं सरकार आणि तिथल्या पोलिसांचं डोकं ठिकाणावर आहे का, हा प्रश्न उपस्थित होत आहेत.
भारतासह जगभरात इस्कॉनच्या मंदिरात पहाटेपासूनच भगवान श्रीकृष्णांची आरती, हरिनामाचा जप प्रवचन अशी सेवा सुरू असते. बांगलादेशातसुद्धा इस्कॉनच्या मंदिरात ही सेवा सुरू होती आणि आहे. मात्र इस्कॉनच्या भक्तांना दहशतवादी असं म्हणण्याचा मूर्खपणा बांगलादेशात केला जात आहे.
बांगलादेश इस्कॉनचे चिन्मय कृष्ण प्रभू यांना तिथल्या पोलिसांनी नुकतीच अटक केली. या अटकेच्या निषेधार्थ आणि बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेधाचे मोर्चे काढण्यात आले. स्थानिक प्रशासनाला या संदर्भात निवेदनदेखील देण्यात आलं.
दरम्यान, भारताचे परराष्ट्र सचिव सागर मिस्त्री हे बांगलादेशात जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. मात्र नुसती चर्चा करून हा प्रश्न सुटणार नाही तर भारताच्या संरक्षण खात्याने या संदर्भात गांभीर्याने पावलं उचलण्याची गरज आहे. भारतात ज्या पद्धतीने प्रत्येकाला सन्मानाची वागणूक देण्यात येते, तशी वागणूक प्रत्येक देशात विशेषतः बांगलादेशात देण्यात यावी, यासाठीची अक्कल तिथल्या सरकारला आणि पोलिसांना मिळावी, हीच सर्वोच्च नियंत्रक भगवान श्रीकृष्णांकडे नम्र प्रार्थना. धन्यवाद.