लोकपत न्यूज नेटवर्क / सातारा / प्रतिनिधी
आत्तापर्यंत आपण सरकारी अधिकारी, कर्मचारी, वकील, डॉक्टर, तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार अशा जबाबदार व्यक्तींनी लाच घेतल्याचं ऐकलं आणि वाचलं होतं. मात्र आता स्वतः एका न्यायाधीशानंच तब्बल पाच लाख रुपयांची लाच घेतली आहे. धनंजय निकम असं साताऱ्याच्या जिल्हा आणि सत्र न्यायाधीश महाशयांचं नाव आहे.
पुणे आणि सातारा अँटीकरप्शन ब्युरोच्या विभागानं ही धाडसी कारवाई केलीय. न्यायाधीश निकम यांच्यासह तिघांना पाच लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं असून या कारवाईमुळे सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
फिर्यादीच्या वडिलांना जामीन देण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. साताऱ्याच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या आवारातच या सर्व प्रक्रिया सुरू होत्या. साताऱ्याच्या एका हॉटेलमध्ये सापळा रचून न्यायाधिश महाशयांसह तिघांना अटक करण्यात आली.
सरकारी अधिकाऱ्यांसह कर्मचारी यापूर्वी लाचखोरीच्या अनेक प्रकरणांत अडकलेले आहेत. मात्र यावेळी स्वतः न्यायाधीश लाचखोरीच्या प्रकरणात अडकल्यामुळे सामान्य जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे. न्यायाधीशच जर लाच घेणार असतील तर सामान्य जनतेला नि:पक्षपातीपणे न्याय कसा मिळणार, असा सर्वांनाच अंतर्मुख करणारा प्रश्न या कारवाईमुळे उपस्थित झाला आहे.