लोकपत न्यूज नेटवर्क / श्रीरामपूर / प्रतिनिधी
सुजाण वाचकहो, बायको पेक्षा दारू बरी? आमचा हा प्रश्न तुम्हाला नक्कीच खटकला असणार. पण काय करणार, वेळच तशी आली आहे. अहो, ट्रॅक्टर घेऊन दारू प्यायला जाऊ दिलं नाही म्हणून एका दारुड्यानं चक्क स्वतःच्या बायकोच्या अंगावरच ट्रॅक्टर घातला आणि तिला ठार केलं. त्यामुळेच अशा दारुड्यांना सांगावसं वाटतं, जरा लाजा धरा रे हरामखोरांनो.
देवा, ब्राह्मणाच्या आणि अग्नीच्या साक्षीनं जिच्याबरोबर सात फेरे घेऊन या जन्माची लग्न गाठ बांधली आणि प्रत्येक वर्षी वडाच्या झाडाला ज्या सौभाग्यवतीनं फेऱ्या मारून ‘जन्मोजन्मी हाच पती मिळो’, अशी प्रार्थना केली, त्या अर्धांगिनीला क्षुल्लक दारूसाठी यमसदनी पाठवण्याचा मूर्खपणा एका दारुड्यानं केलाय.
शिवनाथ कारभारी भवार असं त्या ४० वर्षीय दारुड्याचं नाव आहे. दरम्यान, सुशीला भवार
असं मृत्युमुखी पडलेल्या त्या अभागी पतीव्रतेचं नाव असून श्रीरामपूर तालुक्यातल्या कारेगाव इथं ही दुर्दैवी घटना घडली आहे.
शिवनाथ हा गेल्या बुधवारी (दि. १८) त्याच्या मोटरसायकलवरून दारू पिऊन घरी आला आणि ट्रॅक्टर घेऊन पुन्हा दारू प्यायला चालला होता. हे लक्षात आल्यावर त्याच्या पत्नीने ट्रॅक्टर घेऊन दारू प्यायला जाऊ नका, असं सांगत त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र राग अनावर झाल्याने शिवनाथनं तिच्या अंगावरच ट्रॅक्टर घातला आणि ती गतप्राण झाली.
याप्रकरणी मयत सुशीलाचा भाऊ मल्हारी हरिभाऊ दरंदले (कौठा तालूका नेवासा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिवनाथ भवार याच्याविरुद्ध श्रीरामपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी हे अधिक तपास करत आहेत.