लोकपत डिजिटल मीडिया / पुणे
शैक्षणिक जीवनातली महत्त्वाची दोन वर्षे दहावी आणि बारावीची परीक्षा. खरं तर ही दोन वर्ष प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी आहेत. त्यामुळे सहाजिकच दहावीची आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना निकालाची उत्कंठा लागून आहे. मात्र बारावीच्या विद्यार्थ्यांची उत्कंठा संपली असून बारावीचा निकाल उद्या अर्थात पाच मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन प्रणालीद्वारे जाहीर होणार आहे. दहावीचा निकाल 15 मे पूर्वी लागण्याची शक्यता शिक्षण मंडळाकडून व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं (MSBSHSE) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC/12th) निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल उद्या दुपारी जाहीर केला जाईल. बोर्डाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जाऊन गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करून निकाल पाहू शकतील. दरम्यान, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2025 दरम्यान दहावी आणि बारावीची परिक्षा घेण्यात आली.
दहावीचा निकालदेखील लवकरच जाहीर होणार असल्याचं बोललं जात आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 15 मे पूर्वी घोषित केला जाऊ शकतो. मार्च महिन्यात परीक्षा संपल्यानंतर आता सर्व विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा लागली आहे. मात्र अद्याप मंडळाकडून निकालाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान,दरम्यान, राज्य मंडळाने नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी आणि बारावीची परीक्षा घेतली आहे. या परीक्षेमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आले होते. यंदा राज्यभरात दहावीच्या परीक्षेत 89, तर बारावीच्या परीक्षेत 360 गैरप्रकारांची नोंद झाली आहे.