लोकपत न्यूज नेटवर्क / बीड / प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्याच्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख
यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली. तब्बल वीस दिवसानंतरदेखील या हत्येतल्या प्रमुख मारेकऱ्यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे बीड शहरात आज (दि. २८) सर्वपक्षीय आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात कोल्हापूर संस्थांची छत्रपती संभाजी राजे यांच्यासह अनेक दिग्गज नेते सहभागी झाले.
या मोर्चात संभाजीराजे प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं. या हत्यामागे किंबहुना या हत्येचा जो ‘मास्टरमाईंड’ आहे, त्या वाल्मीक कराडमागे धनंजय मुंडे हेच असून त्यांनी कराड यांना पकडून देण्याची जबाबदारी घ्यावी. किंवा कराड यांना फरार घोषित करून 50 लाखांचं बक्षीस जाहीर करावं, असं आव्हान छत्रपती संभाजीराजे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सरकारला दिलंय.
छत्रपती संभाजीराजे म्हणाले 20 दिवसानंतरदेखील सरकारला मुख्य आरोपींना पकडता आलेलं नाही. सरकार नक्की करतंय काय? धनंजय मुंडे स्वतः म्हणतात, की वाल्मीक कराड हे माझ्याजवळचे आहेत. त्यांच्याशी आर्थिक संबंध आहेत. मग सरकार नक्की कोणाला घाबरतंय?
धनंजय मुंडे यांनी कराड यांची अटकेची जबाबदारी घ्यावी. त्यांना हे जमत नसेल तर सरकारने कराड यांना फरार घोषित करावं आणि कराड यांना पकडून देणाऱ्यास 50 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात यावं. ज्यायोगे एखाद्या सामान्य माणसाचा आर्थिक फायदा होईल, असा टोलादेखील छत्रपती संभाजी राजे यांनी सरकारला लगावला.
शांततेच्या मार्गाने निघालेल्या या आक्रोश मोर्चामध्ये लाखो मराठा समाज बांधवांनी सहभाग घेतला. दरम्यान, हा मोर्चा राजकीय असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलंय. परंतु हा राजकीय नसून सामाजिक मोर्चा असल्याचं मोर्चेकर्यांनी सांगितलं. या मोर्चामध्ये महिला प्रचंड आक्रमक झाल्या होत्या. या हत्याकांडातल्या मारेकऱ्यांना अटक करण्यात आली नाही तर आम्ही थेट मुंबईपर्यंत जाऊ, असा निर्धार महिला मोर्चेकर्यांनी बोलून दाखवला.
एवढं सारं होऊनदेखील राज्य सरकार शांत का आहे, असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे. सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय अमानुषपणे हत्या करण्यात आली. या हत्येचा प्रचंड रोष जनतेच्या मनात आहे. या हत्येचा मास्टर माईंड वाल्मीक कराड हेच असल्याचं सांगितलं जातं. यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही, असं मुख्यमंत्री सांगत असले तरी आतापर्यंत या हत्याकांडातल्या मोठ्या आरोपींना अटक करण्यात सरकारला अपयश आलेलं आहे. वाल्मीक कराडसह सर्वच आरोपींना अटक करा आणि फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे.