संपादकीय…!
माणूस इतका क्रूर कसा काय होऊ शकतो, असा प्रश्न आजकाल प्रत्येकालाच पडलेला आहे कारण दिवसेंदिवस अशा काही घटना घडत आहेत की सामान्य माणसाचं नक्कीच पित्त खवळल्याशिवाय राहत नाही. फार पूर्वी महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा फज्जा उडाल्यानंतर महाराष्ट्राचा बिहार झाल्याचं बोललं जात होतं. मात्र महाराष्ट्रदेखील अमानुष पद्धतीने हत्या होत आहेत.
बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यात असलेल्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख
यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्येवरुन महाराष्ट्रातल्या अनेकांना हाच प्रश्न पडलाय, की माणूस इतका क्रूर होऊ शकतो?
सिगारेट ओढण्याच्या लायटरने सरपंच संतोष देशमुख यांचे डोळे जाळण्यात आले. मारेकर्यांनी त्यांच्या छातीवर बराच वेळ उड्या मारल्या. तब्बल तीन तास हा अमानुष प्रकार सुरू होता. राक्षस सुद्धा अशा पद्धतीने कधी वागले नाहीत. सरपंच संतोष देशमुख यांना मरताना प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या. मात्र त्यांचा मृत्यू झाल्यानंतरदेखील त्यांच्या शरीराचे अतोनात हाल करण्यात आले.
भारतीय राज्यघटनेप्रमाणे किंवा भारतीय दंड विधान कलम कायद्यानुसार खून करणाऱ्याला फाशी किंवा जन्मठेप अशी शिक्षा आहे. मात्र त्यातूनही अनेक प्रकारच्या पळवाटा काढून आरोपी स्वतःचा बचाव करतो. खरं तर संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येप्रकरणी सर्वच आरोपींना जन्मठेपेची किंवा फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी सर्वांचीच इच्छा आहे. कारण ही हत्या आणि ती करणारे सारेच गुन्हेगार माणुसकीला कलंक आहेत.
या गुन्हेगारांना भरचौकात ठेचून मारायला हवंय…!
खून करणाऱ्याला फाशी किंवा जन्मठेप ही शिक्षा आतापर्यंत योग्य होती पण यापुढे किंबहुना अशा घटना वारंवार घडू नये, गुन्हेगारांचं मनोधैर्य वाढू नये, यासाठी बीडच्या सरपंच देशमुख हत्याकांडातल्या सर्वच आरोपींना भर चौकात ठेचून मारण्याची शिक्षा खरं तर असायला हवी. अर्थात ही मागणी आजच्या घडीला कदाचित विपरीत वाटेल. आपला कायदा आणि आपली राज्यघटनाही यासाठी तयार होणार नाही. पण असे गुन्हे यापुढे घडूच नये, असं जर सरकारला वाटत असेल तर कायद्यात अशा शिक्षेची तरतूद नक्कीच असायला हवी.
संतोष देशमुख खून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा…!
बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यात मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली, ती पद्धत जर पाहिली तर अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. अत्यंत गंभीर आणि तितकीच माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. या हत्याकांडातल्या गुन्हेगारांना मोकळं सोडता कामा नये. देशमुख कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा, यासाठी हा खून खटला फास्ट ट्रॅक अर्थात दृतगती न्यायालयात चालवावा, अशी अपेक्षा ज्या निमित्तानं लोकपत न्यूज नेटवर्क परिवारासह आमच्या लाखो वाचकांच्यावतीनं करत आहोत.