लोकपत न्यूज नेटवर्क / बीड / प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यात असलेल्या मस्साजोग या गावचे तरुण, तडफदार सरपंच संतोष देशमुख
यांची अत्यंत अमानुषपणे हत्या करण्यात आली. देशमुख यांचे मारेकरी त्यांना तीन तास निर्दयीपणे मारत होते. दरम्यान मयत संतोष देशमुख यांचे अपहरण झाल्याच्या लक्षात येताच अवघ्या पंधरा मिनिटांत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करायला उशीर केल्याचा आरोप सध्या केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर बीडचे आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना या हत्याकांडामागे जो म्होरक्या किंवा ‘आका’ आहे, त्यानं स्वतःचं मन आवरायला हवं. किंबहुना त्या ‘आका’च्या ‘आकां’नी त्याला समजवायला हवं, अशी प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
ते म्हणाले, या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात संतप्त वातावरण आहे. या जिल्ह्यातल्या प्रत्येकाला सरपंच देशमुख यांच्या हत्येचा प्रचंड राग आलेला आहे. या हत्याकांडाला काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार आहेत. बीडचे जे ॲडिशनल एस. पी. आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन या गुन्ह्याचा तपास करण्यात यावा, या हत्याकांडाचा खटला चालविण्यासाठी उज्वल निकम यांच्यासारख्या अभ्यासू वकिलाची नियुक्ती करण्यात यावी, अशी अपेक्षाही आमदार धस यांनी व्यक्त केली आहे.