लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची भरती प्रक्रिया परीक्षेच्या रूपाने पुण्यात सुरू झाली आहे. या संदर्भात पालकांच्या अनेक प्रकारच्या सूचना होत्या. मात्र ही परीक्षा पुण्यातच घेण्याचं निश्चित झालं. अहिल्यानगर जिल्हा बँकेची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी, यासाठीच पुण्यासारख्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षेची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. परीक्षार्थी आणि त्यांच्या नातेवाईकांनी स्वयंघोषित एजन्टांपासून सावध रहावं, असं आवाहन अहिल्यानगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केलं आहे.
अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी पुणे इथं भरती प्रक्रिया सुरू झाली असून 700 जागांसाठी 28 हजार अर्ज आलेले आहेत. जिल्हा बँकेच्या या भरतीच्या माध्यमातून आपल्या मुलाला अथवा मुलीला किंवा जवळच्या नातेवाईकाला नोकरी मिळावी, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक यांच्याकडे कार्यकर्ते, पदाधिकारी, मित्रपरिवार आणि नातेवाईकांची मोठी वर्दळ वाढली आहे. त्यामुळे बँकेच्या पदाधिकाऱ्यांना मोठी डोकेदुखी झाली. त्यामुळे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी ठोस भूमिका घेतली.
दरम्यान, अहिल्यानगरमध्ये 28 हजार विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याची तांत्रिक सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे ही परीक्षा पुण्यात घेण्याचं ठरलं. शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार कोटेशन मागवून त्यातल्या एका कंपनीला अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या या भरती प्रक्रियेचे कामकाज देण्यात आलं आहे. आशिया खंडातली ही सर्वात मोठी बँक असून या बँकेचा कारभार पारदर्शक आहे. त्यामुळे या बँकेची होणारी भरती प्रक्रियादेखील पारदर्शकपणे व्हावी, हुशार गुणवंत विद्यार्थ्यांना या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून न्याय मिळावा, यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँकेचं प्रशासन प्रयत्न करीत आहे.