लोकपत डिजिटल न्यूज / अहिल्यानगर
अहिल्यानगर शहरातल्या मार्केटयार्ड परिसरातल्या एका संस्थेमार्फत बांधकाम मजुरांना भांड्याचा सेट वितरित करण्याची प्रक्रिया सुरु होती. अक्षरशः भर उन्हात बांधकाम मजुरांनी या भांड्याच्या सेटसाठी रांगा लावल्या. या मजुरांसाठी सावलीची व्यवस्था करण्याचे राज्य सरकारचे आदेश असतानादेखील या संस्थेनं बांधकाम मजुराची क्रूर थट्टा केल्याचं अहिल्यानगर शहरात पहायला मिळालं. दरम्यान, संबंधित संस्थेविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
कामगार कल्याण मंडळामार्फत बांधकाम मुजरांना भांड्याच्या सेटचं वाटप केलं जातं. यासाठी बांधकाम मजुरांना ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक आहे. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातल्या मुजरांसाठी एका संस्थेला हे काम देण्यात आलं आहे. अहिल्यानगरच्या सावेडी उपनगरात या संस्थेचं कार्यालय आहे. भांड्याचा सेट मिळावा, यासाठी मजुरांनी 40° तापमानात रांगा लावल्या.
राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून सार्वजनिक ठिकाणी उन्हामुळे सावलीची व्यवस्था करण्याचे आदेश सर्व विभागांना दिले असले तरी मजुरांसाठी तशी व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. राज्य सरकारच्या कामगार कल्याण मंडळाकडून बांधकाम मजूर आणि घरेलू कामगारांना 17 भांडी असलेल्या सेटचं वितरण केलं जातं.
1 लाख 90 हजार नोंदणीकृत बांधकाम मजूर असून 65 हजार दैनंदिन कामावरच्या 32 हजार सेट वाटप करण्यात आले. दरम्यान, यासाठी खासगी एजंट बांधकाम मजुरांना सर्रास पैशांची मागणी करत आहेत. वास्तविक पाहता यासाठी कोणी पैशांची मागणी करत असेल तर तक्रार करण्याचं आवाहन कामगार कल्याण मंडळाच्यावतीनं करण्यात आलेलं आहे.