लोकपत न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
तब्बल 50 कोटी रुपयांच्या ठेवींचा घोटाळा झालेल्या भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटच्या विरोधात उद्या (दि. ३०) पाचशे ठेवीदारांचं ठिय्या आंदोलन करण्यात येणार होतं. परंतू एमआयडीसी पोलिसांच्या विनंतीनुसार सदरचं ठिय्या आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं आहे. आरोपींना अटक न झाल्यास आठ दिवसांनी म्हणजे येत्या शनिवारी पुन्हा ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचं ठेवीदारांच्यावतीनं सांगण्यात आलंय.
या संदर्भात भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटचे ठेवीदार एस. पी. राकेश ओला यांच्याकडे गेले असता एस. पी. ओला यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना ठेवीदारांसमोरच विचारणा केली, की या आर्थिक घोटाळ्यातल्या मुख्य आरोपींसह इतर आरोपींना अटक करण्यात इतका उशीर का होतोय? निवडणूक काळात ठेवीदार आपल्याकडे आले नाहीत. मात्र यापुढे ते सातत्याने आपल्याकडे येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला अतिशय जबाबदारीने काम करावं लागणार आहे.
या आर्थिक घोटाळ्याचं फॉरेन्सिक ऑडिट करा. या आर्थिक घोटाळ्याच्या तपासाला गती द्या. ज्यांचा ज्यांचा या आर्थिक घोटाळ्यात सहभाग आहे, त्यांना तातडीने अटक करा. मुख्य आरोपी भारत पुंड यालाही लवकरात लवकर अटक करा, असे आदेशही एस. पी. ओला यांनी दिले.
दरम्यान, उद्याच्या ठिय्या आंदोलनासंदर्भात ठेवीदार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गेले असता सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांनी ठेवीदारांना आठ दिवस थांबण्याची विनंती केली. आठ दिवसांत मुख्य आरोपीसह ज्यांचा ज्याचा या आर्थिक घोटाळ्यात सहभाग आहे, त्या सर्वांना अटक करु. जर अटक केली नाही तर पुढच्या शनिवारी आंदोलन करा, अशी ग्वाही सपोनि चौधरी यांनी ठेवीदारांना दिली. येत्या आठ दिवसांत भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटचा संस्थापक अध्यक्ष भारत पुंड याच्यासह कोणा कोणाला अटक केली जाते, याकडे ठेवीदारांचं लक्ष लागलं आहे.