लोकपत न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी / अहिल्यानगर
भारतीय जनता पार्टीच्या रिक्त झालेल्या अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुकांची तयारी सुरु असली तरी नेवासे तालुक्यातला सर्व समावेशक चेहरा असलेले, समाजातल्या सर्वच घटकांना सोबत घेऊन चालणारे आणि नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत नेवासा मतदारसंघातून विद्यमान आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या विजयाचं ‘परफेक्ट प्लॅनिंग’ ज्यांनी केलं, ते यशस्वी, मनमिळावू व्यावसायिक सचिन देसरडा यांच्या नावाला पक्षश्रेष्ठींकडून पसंती दिली जात असल्याची चर्चा आहे.
भाजपचं जिल्हाध्यक्ष पद विठ्ठलराव लंघे यांच्याकडे होतं. मात्र त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेकडून विधानसभेची उमेदवारी केली आणि त्या निवडणुकीत ते विजयी झाले. त्यांच्या या विजयामुळे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष पद हे रिक्त झालंय. लवकरच या पदाची निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. अर्थात यासाठी उत्तर नगर जिल्ह्यातल्या अनेकांनी जय्यत तयारी केली असली तरी सचिन देसरडा यांच्याविषयी पक्षश्रेष्ठींच्या मनात ‘सॉफ्ट कॉर्नर’ असल्याचं या निमित्तानं बोललं जात आहे.
सचिन देसरडा यांचा व्यवसायाच्या निमित्ताने अनेकांशी संबंध येतो. मात्र प्रत्येकाशी व्यवसायाच्या पलीकडची मैत्री जपण्याचा ते सातत्यानं प्रयत्न करत असतात. ‘नो सेटलमेंट ओन्ली डेव्हलपमेंट’ या ‘टॅगलाईन’नुसार नेवासे तालुक्यातल्या प्रस्थापित राजकीय मंडळींशी कुठलीच हातमिळवणी न करता देसरडा यांचा राजकीय प्रवास अखंडपणे सुरु आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी नेवासे तालुक्यातल्या सोनई गावात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावेळी सचिन देसरडा यांनी सोनई गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला होता. स्वपक्षातल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांव्यतिरिक्त अनेक राजकीय पक्षांमध्ये देसरडा यांना मानणारा मोठा वर्ग आहे. माजी खासदार स्वर्गीय तुकाराम गडाख यांच्या विचारधारेनुसार देसरडा यांचा राजकीय झंझावात सुरु आहे.
विशेष म्हणजे माजी खासदार स्वर्गीय तुकाराम गडाख यांचे बंधू किसनराव गडाख (पेशवे), सचिन देसरडा, पंचगंगा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा प्रभाकर काका शिंदे, राजू काका मते, ऋषिकेश शेटे पाटील, प्रताप काका चिंधे, ज्ञानेश्वर माऊली पेचे, डॉ. बाळासाहेब कोलते आदींच्या उत्कृष्ट नियोजनामुळे विठ्ठलराव लंघे यांची गेल्या वीस वर्षांनंतर विधानसभेत ‘एन्ट्री’ झाली, ही वस्तुस्थिती कोणीही नाकारु शकत नाही.
दरम्यान, भाजपच्या अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्ष पदासाठी सचिन देसरडा यांच्या नावाला या जिल्ह्यातून फारसा कोणाचा विरोध नाही. देसरडा यांचे सर्वांशी चांगले ऋणानुबंध आहेत. देव, देश आणि धर्मासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असलेले सचिन देसरडा हे धर्म, जात, गरीब, श्रीमंत असा कुठलाही भेदभाव न करता अनेकांच्या सुखदुःखात ते सातत्यानं हजर असतात. घोडेगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सचिन देसरडा यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रकारची लोकोपयोगी कामं मार्गी लावण्यात आली आहेत तर काही विकासाभिमुख प्रस्ताव विचाराधीन असून त्यासाठी देसरडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा शासनाकडे अथक पाठपुरावा सुरु आहे. एकंदरितच, राजकारण आणि समाजकारणातल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर सचिन देसरडा यांना अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी नक्कीच मिळू शकते, असा आशावाद सचिन देसरडा यांच्या समर्थकांमधून व्यक्त केला जात आहे.