लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
देशात महिला खरोखरच सुरक्षित नाहीत, याचा प्रत्यय वेळोवेळी आलेला असतानाच भारताच्या लष्करी विभागातल्या हवालदार आणि सुभेदार या पदांवर नोकरी करत असलेल्या दोघा वासनांध नराधमांनी एका 34 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची बाब उघडकीस आली आहे. हवालदार वैशाख ओ. पी. आणि सुभेदार एस. के. रेड्डी अशी त्या नराधमांची नावं आहेत. पतीला ठार मारण्याची धमकी देत या दोन वासनांध नराधमांनी त्या महिलेवर अत्याचार केल्याची फिर्याद देण्यात आली. त्यानुसार भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात या दोन वासनांध आणि लिंगपिसाट नराधमांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या जबाबदार नेत्यांना महाराष्ट्रातल्या जनतेची ही आर्त किंकाळी आहे, की या देशातल्या महिलांच्या अब्रूचे धिंडवडे काढले जात असताना तुम्ही आणखी किती दिवस हातावर हात धरुन बसणार आहात? तुम्ही या असहाय्य महिलांच्या सुरक्षेची हमी घेणार आहात की नाही? या देशात महिला फक्त ‘भोग वस्तू’च आहेत का? लष्करी विभागात नोकरी करणारे जबाबदार लोकच जर महिलांच्या अब्रूंचे लचके तोडायला लागले तर सामान्य जनतेनं कोणाकडे पाहायचं? या देशातल्या असहाय्य महिलांनी कोणाच्या भरवशावर राहायचं?
तर मग कडक कायदे करा ना…!
देशात गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजप आणि मित्र पक्षाच्या लोकांचीच सत्ता आहे आहे. सध्या विरोधक नामोहरम झाले आहेत. अशा परिस्थितीत चांगली निर्णय घेण्यासाठी भाजपाने मित्र पक्षाच्या सत्ताधारी लोकांना पोषक वातावरण आणि मोठी संधी आहे. या संधीचा सदुपयोग करत सत्ताधारी भाजप आणि मित्र पक्षाच्या लोकांनी महिलांवरचे वाढते अत्याचार कमी करण्यासाठी कठोर कायदे करावेत, अशी मागणी देशभरातल्या जनतेमधून केली जात आहे.
गुन्हा सिद्ध झाल्यास लिंगपिसाट आरोपीची धिंड काढण्यात यावी…!
महिलांवर अत्याचार करण्याची कोणाचीही हिंमत होऊ नये, यासाठी कठोर कायदे करण्याची आणि त्या कायद्यांची निपक्षपातीपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. ठिकठिकाणी पोलीस सध्या गुंडांची धिंड काढत असल्याच्या बातम्या अधून मधून प्रकाशित आणि प्रसारित होत आहेत. अशाच पद्धतीने अत्याचार करणाऱ्या नराधमांची धिंड काढली जाण्याची गरज आहे. असं झाल्यास महिलांकडे वाईट नजरेनं पाहण्याची हिंमत कोणी करणार नाही. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने गुन्हा सिद्ध झालेल्या लिंग पिसाट नराधमाची धिंड काढण्याची परवानगी पोलिसांना द्यावी, अशी अपेक्षा देखील या निमित्तानं केली जात आहे.