लोकपत न्यूज नेटवर्क / इंदूर / प्रतिनिधी
आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या याचकाला मदत करण्याच्या भावनेतून काहीतरी देणं, ही आपली संस्कृती आहे. मात्र या संस्कृतीचा गैरफायदा घेत अनेकांनी भीक मागण्याच्या या व्यवसायाचा मार्ग निवडला आहे. विशेष म्हणजे भीक मागण्याच्या या व्यवसायातून अनेकजण ‘मालामाल’ झाले आहेत. काहींनी तर आलिशान बंगले बांधले आहेत.
आपल्या संस्कृतीत दान – धर्म करणं, हे प्रत्येक गृहस्थाचं कर्तव्य असल्याचं म्हटलं असलं तरी एखाद्याला भीक देणे आणि दान देणं यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळेच कदाचित भीक मागण्याच्या आणि भीक देण्याच्या या प्रवृत्तीला आपल्याकडे पाप समजलं जातं.
या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश राज्यातल्या इंदूर शहरात तिथले जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी एक आगळावेगळा नियम तयार केला असून भीक देणाऱ्यांबद्दल महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जानेवारीनंतर जे कोणी भीक देतील, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.
जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी या संदर्भात जनजागृती सुरु केली आहे. या जनजागृतीदरम्यान त्यांना अनेक धक्कादायक बाबी समजल्या. काही भीक मागणाऱ्यांची मुलं बँकेत नोकरीला आहेत. या जनजागृती दरम्यान एका भिकाऱ्याकडे 29 हजार रुपये सापडले. काही जण थेट राजस्थानहून मध्यप्रदेशमध्ये भीक मागायला आल्याचं या जनजागृतीत समोर आलं. दरम्यान, मध्यप्रदेशमध्ये जो निर्णय घेण्यात आला, तसा निर्णय महाराष्ट्रात घेतला जाणार का, याची सर्वांना उत्सुकता आहे.