लोकपत न्यूज नेटवर्क / मुंबई प्रतिनिधी /
बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्याच्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातला ‘मास्टरमाईंड’ अशी ओळख झालेला, दोन कोटी रुपयांच्या खंडणीचा गुन्हा दाखल असलेला, या गुन्ह्यात फरार असलेला आणि 22 दिवसानंतर सीआयडी पोलिसांना आज (दि. ३१) शरण आलेला वाल्मीक कराड संपूर्ण राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. मात्र कराड याला ज्या धनंजय मुंडे यांचा वरदहस्त असल्याचं वेळोवेळी बोललं गेलं, त्या धनंजय मुंडे यांच्या अडचणींत मात्र आणखी वाढ झाली असल्याचं पाहायला मिळत आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे टीकेचे धनी बनलेले धनंजय मुंडे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या रडारावर आहेत. हे सारं कमी म्हणून की काय, मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबानेदेखील धनंजय मुंडे यांना जबाबदार धरत मुंडे यांच्याविरुद्ध याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावर ठेवण्यात येऊ नये, त्यांचा राजीनामा घ्यावा, अशा प्रकारचे अनेक मुद्दे न्यायालयासमोर ठेवण्यात आले आहेत. या मुद्द्यांबरोबरच मुंडे आणि कराड यांचे फोटोदेखील न्यायालयासमोर सादर करण्यात आले आहेत.
हौद से गयी वो बूंद कैसे आएगी?
मालमत्ता जप्त केली जाईल, या भीतीने वाल्मीक कराड सीआयडी पोलिसांना शरण आला असल्याचं वक्तव्य आमदार सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं आहे. तब्बल 22 दिवसांनी वाल्मीक कराड पोलिसांना शरण आला. या इतक्या प्रदीर्घ कालावधीमध्ये मुंडे यांचा हस्तक असलेला कराड हा नक्की कोणाच्या आशिर्वादाने लपून बसला होता, इतके दिवस पोलिसांना शरण न येता मुंडे यांचं राजकारण धोक्यात आणणाऱ्या कराड याला नक्की कोण पाठीशी घालतंय, हे प्रश्न अनुत्तरितच आहेत. मात्र 22 दिवसानंतर हजर होऊनदेखील धनंजय मुंडे यांचे जे राजकीय वाटोळं व्हायचं ते झालं. बदनामी व्हायची ती झाली. त्यामुळे हौद से गयीं वो बूंद से कैसे आएगी, हादेखील प्रश्न महत्त्वाचा आहे.