लोकपत न्यूज नेटवर्क मुंबई / प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यात असलेल्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून महाराष्ट्राचं राजकारण आगामी काही दिवसांमध्ये चांगलंच पेटणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. देशमुख हत्याकांडानंतर मराठा समाज प्रचंड आक्रमक झाला आहे. कोपर्डी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या मूकमोर्चाप्रमाणे देशमुख हत्याकांडात सहभागी असलेल्या परंतु फरार असलेल्या सर्वच आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात मराठा समाजाच्यावतीनं मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे राज्याचं राजकारण आणखी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर आज (दि. २८) बीडमध्ये काढण्यात आलेल्या आक्रमक मोर्चामध्ये बोलताना मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी महाराष्ट्रातल्या सर्वच मराठा समाजबांधवांनी उभे राहण्याचे आवाहन केलं. कोणाचा बाप जरी आला तरी हे ‘मॅटर’ दाबणार नाही. या आरोपींना अटक करुन फाशी द्या, असं सांगतानाच यापुढे जशास तसे उत्तर देण्याची तयारी ठेवा, असंही जरांगे म्हणाले.
दरम्यान, या आक्रोश मोर्चामध्ये बोलताना संतोष देशमुख यांच्या मुलीच्या आर्त किंकाळीने अवघा महाराष्ट्र हळहळलाय. ‘काल आकाशात ढग आले होते. म्हणून सूर्य दिसला नाह. परंतु आज ढग नाहीत. त्यामुळे सूर्य आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. मात्र माझ्या बापाची हत्या झाली. गेल्या वीस दिवसांपासून माझा बाप आम्हाला दिसत नाही. यापुढेदेखील तो कधीच दिसणार नाही. आज जेवढ्या संख्येनं तुम्ही आमच्या कुटुंबाबरोबर आला आहात, असंच आमच्या पाठीशी रहा. आपण सर्व मिळून सरकारकडून न्याय मिळवू’.
अंजली दमानिया यांचा खळबळजनक खुलासा…!
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राजकारण केलं जात आहे का, अशी शंका उपस्थित केली जात आहे. बीडमध्ये निघालेल्या मोर्चाला राजकीय मोर्चा असं संबोधणाऱ्या अंजली दमानिया यांनी एक मोठा खळबळजनक खुलासा केला आहे. या हत्याकांडातल्या तीन आरोपींचा खून करण्यात आला असल्याचा फोन त्यांना आला असल्याचं दमानिया यांनी म्हटलं आहे. यावर मंत्री संजय शिरसाठ यांनी खुलासा करताना सांगितलं, की अंजली दमानिया यांच्या या खळबळजनक खुलाशामुळे पोलिसांच्या तपास कामात अडथळे येत आहेत.
कुठं लपले आहेत वाल्मिक कराड?
संतोष देशमुख यांची हत्या होऊन वीस दिवस उलटले आहेत. तरीही या हत्याकांडाचा ‘मास्टरमाईंड’ अशी ज्यांची ओळख झाली आहे, ते वाल्मीक कराड अद्यापदेखील फरारच आहेत. कराड यांचा जोपर्यंत शोध लागत नाही, तोपर्यंत या हत्याकांडाचं पूर्ण सत्य समाजासमोर येणार नाही. वाल्मीक कराड यांना जमिनीने गिळलं आहे की आकाशानं खाल्लं आहे, हेच कोणाला समजायला तयार नाही. राज्याचा गृह विभाग नक्की काय करतोय, कराड यांना कोण पाठीशी घालतंय, पोलिसांना कराड का सापडत नाहीत, नक्की कुठे लपले आहेत वाल्मीक कराड, असे अनेक प्रश्न महाराष्ट्राला पडले आहेत. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातल्या 13 कोटी जनतेला या प्रश्नाचं उत्तर देण्यात सक्षम आहेत का, हादेखील महत्त्वाचा प्रश्न आहे.