बाळासाहेब शेटे पाटील / अहिल्यानगर
लोकपत न्यूज नेटवर्कनं सुरु केलेल्या ‘मल्टीस्टेटची बनवाबनवी’ या वृत्तपालिकेचा आजचा (दि. ९) हा तिसरा भाग आहे. ठेवीदारांचा विश्वास संपादन करत गोळा केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी बुडाल्या, अशी जोरदार चर्चा तुमच्या कानावर येत असली तरी या पाठीमागचं अंतिम सत्य वेगळंच आहे. ठेवींच्या रूपाने गोळा केलेले करोडो रुपये मल्टीस्टेटचे अध्यक्ष क्रिप्टो करंन्सी आणि शेअर मार्केट या ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये गुंतवित आहेत, हे वास्तव फारच थोड्या ठेवीदारांना माहित आहे. खरं तर या ठेवींवर मल्टीस्टेटच्या अध्यक्षांना करोडो रुपयांचा व्याजाचा ‘मलिदा’ मिळाला आहे.
भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटचा अध्यक्ष भारत पुंड हा सध्या अहिल्यानगरच्या सबजेलमध्ये एक कच्चा कैदी म्हणून बंदीवान आहे. पुंड याच्यावर तब्बल पन्नास कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे. या ठेवी पुंड याने ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये गुंतविल्या असून त्याला तब्बल ४० कोटी रुपयांचं व्याज मिळालं आहे. मात्र पुंड हा सध्या असा काही अभिनय करत आहे, जसा की तो फारच निष्पाप, निरापराध आहे. खरं तर पोलिसांचे दांडके पडले, की पुंड हा पोपटासारखा बोलायला लागेल.
खाटकाला शेळी धार्जिण…!
ग्रामीण भागांत यात्रा – जत्रांच्या कालावधीमध्ये ‘कंदुरी’ नावाचा सामूहिक भोजनाचा कार्यक्रम असतो. यामध्ये बोकड कापला जातो. मात्र तो बोकड कापण्यासाठी विशिष्ट माणसाला बोलावलं जातं आणि ग्रामीण भागात त्याला ‘खाटीक’ म्हणतात. यावरुन बहुदा ‘खाटकाला शेळी धार्जिण’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित झाली आहे. मात्र या म्हणीचा इथं उल्लेख करण्याचं कारण एवढंच, की लबाड, धुर्त, कावेबाज, मतलबी लोकांच्या मल्टीस्टेटमध्ये सर्वसामान्यांनी पैसा गुंतवला तर त्या पैशांवर मल्टीस्टेटचे अध्यक्ष नक्कीच ‘मालामाल’ होताहेत. मात्र वेळ निघून गेलेली असते. ठेवीदारांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग अतिशय धूसर झालेला असतो. दुर्दैवानं ठेवीदारसुद्धा लाखो रुपयांची गुंतवणूक करताना बारकाईनं विचार करत नाहीत, हेच अंतिम सत्य आहे.
आर्थिक फसवणूक झाल्यानंतर पोलिसांकडे गेलं, म्हणजे प्रश्न मार्गी लागतोच, असं होत नाही. थोडक्यात म्हणजे वेळ निघून गेल्यानंतर केळ खाण्यात काहीच अर्थ नाही.
3 हजार 700 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा करणारा ज्ञानराधा मल्टीस्टेटचा अध्यक्ष आणि त्याचे साथीदार अटकेत आहेत. काही दिवसानंतर लोकंदेखील हे सारं विसरून जातील. ज्या पद्धतीने अहिल्यानगरमध्ये संपदा नागरी सहकारी पतसंस्थेचा आर्थिक घोटाळा लोक विसरले. असो, किमान यापुढे तरी कोणाची आर्थिक फसवणूक होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करत इथंच थांबत आहोत, धन्यवाद.