बाळासाहेब शेटे पाटील / अहिल्यानगर
या वृत्तमालिकेतल्या आजच्या चौथ्या भागात आपण मल्टीस्टेट या इंग्रजी शब्दाचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी, अहिल्यानगर जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या सर्वच ठेवीदारांना आमचा जाहीर सवाल आहे, की तुमच्या कष्टाचा पैसा मल्टीस्टेट, मल्टिसिटी निधी फायनान्स कंपन्यांमध्ये ज्यावेळी तुम्ही ठेवला होता, त्यावेळी तुम्ही संबंधित वित्तीय संस्थेच्या अध्यक्षांकडे त्या मल्टीस्टेटचा ताळेबंद, नफा तोटा पत्रक, तेरीज पत्रक, त्या मल्टीस्टेटचं भाग भांडवल, त्या मल्टीस्टेटने केलेलं एकूण कर्ज वाटप याविषयीची सविस्तर माहिती का घेतली नाही? ज्या मल्टीस्टेटमध्ये तुम्ही तुमच्या कष्टाचा पैसा गुंतविला, त्यावेळी त्या मल्टीस्टेटच्या अध्यक्षाने तुमच्यावर जादूटोणा केला होता का? तुम्हाला इतकी भुरळ कशी पडली?
मल्टी आणि स्टेट हे दोन शब्द प्रामुख्याने कोणत्याही वित्तीय संस्थेच्या विस्तारीकरणासंदर्भात परिचय करून देतात. मल्टी या इंग्रजी शब्दाचा मराठीतला अर्थ अनेक असा आहे आणि स्टेट या शब्दाचा मराठीतला अर्थ राज्य आहे. म्हणजेच ज्या वित्तीय संस्थेच्या अनेक राज्यांमध्ये शाखा आहेत, त्या वित्तीय संस्थेला मल्टीस्टेट असं म्हटलं जातं किंवा मल्टीस्टेटचा दर्जा ज्या वित्तीय संस्थेला दिला जातो, त्या वित्तीय संस्थेच्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये शाखा असायला हव्यात.
आता तुम्हीच सांगा, तुम्ही ज्या मल्टीस्टेटमध्ये तुमच्या कष्टाचा पैसा गुंतविला आहे, त्या मल्टीस्टेटच्या कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, पंजाब, ओरिसा, बिहार, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर या आणि अशा किती राज्यांत शाखा आहेत? मल्टीस्टेटच्या अध्यक्षाने गोड गोड बोलून तुमचा केसाने गळा कापला, हे न समजायला ठेवीदार बांधवांनो, तुम्ही इतके बालिश आणि मूर्ख आहात का? एखाद्या लहान मुलालासुद्धा समजतं, की आपलं हित कशात आहे? आपल्याला कोण फसवत आहे? तुम्ही तर प्रौढ आणि या देशाचे जबाबदार नागरिक आहात. तुमच्या जवळचा पैसा घेऊन तुम्हाला मुर्खात काढत असा कसा कोणीही तुमची आर्थिक फसवणूक करु शकतो? ठेवीदारांनो, आता तरी भानावर या.
ज्या मल्टीस्टेटमध्ये तुम्ही तुमच्या कष्टाचा पैसा गुंतवला आहे, त्या मल्टीस्टेटचा व्यवसाय परवाना म्हणजे लायसन कोणतं आहे? त्या मल्टीस्टेटचं संचालक मंडळ अस्तित्वात आहे का? असल्यास त्या संचालक मंडळात कोणाकोणाची वर्णी लावण्यात आलेली आहे? त्या मल्टीस्टेटचा एनपीए किती आहे? त्या मल्टीस्टेटचं भाग भांडवल, गंगाजळी किती आहे? तुम्ही तुमच्या कष्टाचा पैसा ज्या मल्टीस्टेटमध्ये गुंतवला आहे, त्या मल्टीस्टेटचा ताळेबंद कधी सादर केला जातो? त्या मल्टीस्टेटच्या अन्य राज्यांत वास्तवातल्या (कागदोपत्री नव्हे) किती शाखा आहेत? हे असले प्रश्न प्रौढ वयाच्या तुम्हा ठेवीदारांना कसे पडत नाहीत? असो, स्वतःचं आणखी किती आर्थिक वाट्टोळं करून घ्यायचं, हे ठरवण्याची सुबुद्धी परमेश्वर आता तरी तुम्हाला देवो, या अपेक्षेसह इथंच थांबतो आहोत. यानंतरच्या भागात मल्टीस्टेटच्या शाखा कशा बनावट आहेत, याचा पंचनामा करणार आहोत. धन्यवाद.