सूज्ञ आणि सुजाण ठेवीदारांनो, नमस्कार. मागच्या भागात आपण मल्टीस्टेटचा अर्थ समजून घेतला. आता वेगवेगळ्या राज्यात मल्टीस्टेटच्या शाखा असल्याचे भासवून कशा पद्धतीने ठेवीदारांना मूर्खात काढलं जातं, याविषयी आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मल्टीस्टेटमध्ये जो पैसा गुंतविला जातो, तो कुठून येतो, याविषयी थोडीशी चर्चा करु. स्पष्ट सांगायचं झालं तर हा पैसा बहुतांश ‘दोन नंबर वाल्यां’चा असतो. ज्याला ‘ब्लॅक मनी व्हाईट’ करायचा असतो, अशा भामट्या लोकांचा पैसा मल्टीस्टेटमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात गुंतविलेला असतो.
अशा भामट्या लोकांबरोबरच काही पापभिरु, सामान्य लोकदेखील मल्टीस्टेटमध्ये पैसे गुंतवितात. मात्र ‘घोटाळा’ झाला तर सर्वात जास्त मनस्ताप याच लोकांना होतो. कारण भामट्या लोकांनी अंगाला घाम येईपर्यंत कुठेही कष्ट केले नसतात. वाईट मार्गाने त्यांचा हा पैसा जसा येतो तसा जातो. विशेष म्हणजे मल्टीस्टेटने ‘गडबड’ केली तरी भामट्या लोकांना फारसा फरक पडत नाही. मुळात हा पैसा त्याचा नसतोच. असो, आता प्रत्यक्षात मल्टीस्टेटच्या शाखांचा विस्तार आणि त्याद्वारे ठेवीदारांना मुर्खात कसं काढलं जातं, हे जाणून घेऊया.
एका मोठ्या मल्टीस्टेटमध्ये अनेक कॉम्प्युटर असतात. त्या प्रत्येक कॉम्प्युटरमध्ये कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, ओरिसा, गुजरात, आंध्रप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार अशा वेगवेगळ्या राज्यांच्या नावांची ‘सॉफ्टवेअर’ असतात. ज्यावेळी दुसऱ्या राज्यातला उदाहरणार्थ कर्नाटकचा एखादा ठेवीदार येतो आणि लाखो रुपयांच्या ठेवी ठेवतो, तेव्हा त्याला ‘सेम डे’ म्हणजे त्याच दिवशी ठेवींची पावती दिली जात नाही. दुसऱ्या दिवशी त्याला बोलवलं जातं आणि पावती दिली जाते.
आता तुम्ही म्हणाल, दुसऱ्या दिवशी बोलण्याचे कारण काय? अहो, इथंच तर खरी गंमत आहे. दुसरे किंवा तिसऱ्या दिवशी ठेवीदाराला पावती घेण्यासाठी बोलण्याचं कारण एवढंच, की त्याला संबंधित मल्टीस्टेटच्या ‘गडबडी’विषयी संशय येऊ नये आणि त्याने ठेवलेले ठेवींची पावती त्याला कर्नाटक राज्यातून कुरियरद्वारे आल्याचं खोटंच सांगता यावं, हाच यामागे या लबाड लोकांचा हेतू असतो. हे तर काहीच नाही, एका खोलीमध्ये चार ते पाच कॉम्प्युटर्स ठेवले जातात. त्या एकाच खोलीत असलेल्या कॉम्प्युटर्समध्ये वेगवेगळ्या मल्टीस्टेटच्या नावाने सॉफ्टवेअर बसवले जातात. उदाहरणच द्यायचं ठरलं तर भाग्यलक्ष्मी, ज्ञानराधा या आणि अशा आणखी दोन-तीन मल्टीस्टेटच्या नावानं एकाच ठिकाणी आर्थिक व्यवहार केले जातात. असो, तूर्तास इथंच थांबत आहोत. यानंतरच्या भागात मल्टीस्टेट नक्की कशासाठी, यावर सविस्तरपणे चर्चा करू. धन्यवाद.