सूज्ञ आणि सुजाण ठेवीदारांनो, नमस्कार. या वृत्तमालिकेच्या सहाव्या भागात तुमच्याशी हितगुज साधण्यापूर्वी काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. एका अर्थाने आम्हाला तुमच्या आणि या लेखाच्या माध्यमातून खरं तर ‘हमारे दिल की भडास निकालनी हैं’. अर्थात तुमच्यादेखील मनातही मल्टीस्टेट, मल्टीसिटी निधी फायनान्स कंपन्यांच्या ढोंगी, स्वार्थी, मतलबी, चाणाक्ष, कपटी, केसानं गळा कापणाऱ्या अध्यक्षांविरुद्ध नक्कीच संताप असणार. पण तुम्ही तो बोलून दाखवू शकत नाहीत.
आम्ही मात्र असल्या मतलबी, कपटी आणि भोळ्याभाबड्या ठेवीदारांचा केसानं गळा कापणाऱ्या अध्यक्षांच्या नाटकी आणि ढोंगी वृत्तीला अजिबात भीक घालत नाही. त्यामुळेच ‘मल्टीस्टेटची बनवाबनवी’ या वृत्तमालिकेचे अनेक भाग करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. अजूनही आमच्याकडे हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच अन्यायग्रस्त ठेवीदारांनी संपर्क साधला आहे. आमचा तुम्हाला जाहीर सवाल आहे, तुम्ही कोणाला घाबरता आहात? तुमच्या न्याय आणि हक्कासाठी आम्ही कोणालाही जाब विचारण्यास तयार आहोत. पण मग तुम्ही असे शेपूट का घालता आहात? तुमचं कोण काय वाकडं करणार आहे?
आम्ही या लेखाच्या सुरुवातीलाच ‘सौ चूहें खाकर बिल्ली चली…’ असं का म्हटलंय, अशी शंका तुमच्या मनात आली असेलच. या संदर्भात आम्ही तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, की सहकार क्षेत्रात काही लोक गोरगरिबांच्या पैशांवर डल्ला मारत सामाजिक कार्याचा आव आणत आहेत. भिंतींवर टांगलेल्या दिनदर्शिकेच्या माध्यमातून तत्त्वज्ञानाच्या मोठमोठ्या गप्पा मारत आहेत. अशा भामट्या लोकांना आम्ही लवकरच ‘एक्सपोज’ करणार आहोत.
मल्टीस्टेट कशासाठी, या मुद्द्यावर खरं तर आम्हाला या भागात चर्चा करायची आहे. याचं एकाच वाक्यात उत्तर द्यायचं ठरलं तर पतसंस्था आणि बँकांमध्ये आर्थिक घोटाळे घालायचे, ते घोटाळे दडपविण्यासाठी किंवा ठेवीदारांना स्वतःच्या पापकृत्यांचा कुठलाच सुगावा लागू नये, यासाठी खऱ्या अर्थानं मल्टीस्टेटची स्थापना केली जाते, हे आमचं आतापर्यंतच निरीक्षण आहे. भारताचे एक जागरुक नागरिक या नात्याने यावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न आम्ही आमच्यापरीने करत आहोत.
एक लक्षात घ्या, मल्टीस्टेटचं नियंत्रण हे स्थानिक जिल्हाधिकारी किंवा जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे नाही. तर ते नवीदिल्लीतल्या केंद्रीय सहकार निबंधक कार्यालयाकडे आहे. यानंतरच्या भागात त्या कार्यालयाचा पत्ता आणि केंद्रीय सहकार उपनिबंधक या विभागाची दयनीय अवस्था शब्दबद्ध करत आहोत.
जाता जाता तुम्हाला एकच सांगावसं वाटतं, की ‘मल्टीस्टेटची बनवाबनवी’ या वृत्तमालिकेच्या प्रत्येक भागाचं बारकाईनं वाचन करा. नीट अभ्यास करा. तुम्हाला ज्यांनी आर्थिकदृष्ट्या फसवलंय, व्याज तर सोडाच पण तुमची मुद्दलसुद्धा द्यायला मल्टीस्टेट, मल्टिसिटी निधी फायनान्स कंपन्या टाळाटाळ करत आहेत. अशा लबाड, कपटी लोकांना सोडू नका. तुमच्या लढाईत आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत. धन्यवाद.