मल्टिस्टेटची बनवाबनवी भाग : १
बाळासाहेब शेटे पाटील / अहिल्यानगर
सुजाण वाचकहो, नमस्कार. मल्टीस्टेटची बनवाबनवी ही वृत्तमालिका आजपासून सुरू करत आहोत. या वृत्त मालिकेच्या पहिल्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गरीब, मध्यमवर्गीय, प्रगतशील शेतकरी, छोटी व्यावसायिक, मोठे व्यावसायिक, शिक्षक, डॉक्टर हे सारे स्वतःच्या आयुष्यातल्या आर्थिक कमाईची वेगवेगळ्या मल्टीस्टेटमध्ये गुंतवणूक करत असतात. मात्र या सर्वांचा संबंधित मल्टीस्टेटचे अध्यक्ष आणि कर्मचारी कशा पद्धतीने या गुंतवणूकदारांचा ‘केसानं गळा कापतात’, हे जळजळीत वास्तव तुमच्या सर्वांच्या समोर यावं, हाच खरं तर या वृत्तमालिकेमागचा आमचा उद्देश आहे.
सर्वच गुंतवणूकदारांना आमचा जाहीर सवाल आहे, तुम्ही घर, जमीन किंवा एखादा प्लॉट खरेदी खरेदी करण्यापूर्वी ज्याप्रकारे बारीक-सारीक गोष्टी तपासून पाहता. उदाहरणार्थ त्या जमिनीचा सर्च रिपोर्ट, गट नंबर, सातबारा आठ अ, त्या जमिनीवर एखाद्या बँकेचा किंवा पतसंस्थेचा बँकेचा बोजा आहे का, हे सर्व पाहता की नाही? बरोबर ना? मग लाखो रुपये गुंतविण्यापूर्वी ज्या मल्टीस्टेटमध्ये तुम्ही ते गुंतविणार असता, त्या मल्टीस्टेटची विश्वासार्हता तुम्ही तपासता का?
भाजीची जुडी खरेदी करताना चार-पाच वेळा आलटून-पालटून पाहणारे तुम्ही आम्ही, लाखो रुपये गुंतविण्यापूर्वी संबंधित मल्टीस्टेटची सद्यस्थिती, त्या मल्टीस्टेटकडे असलेलं भाग भांडवल, त्या मल्टीस्टेटने केलेलं कर्ज वाटप आदी सर्व बारीक-सारीक गोष्टींची खातरजमा तुम्ही का करत नाही? विविध प्रकारच्या मल्टीस्टेटमध्ये तुम्ही ज्यावेळी लाखो करोडो रुपयांच्या ठेवी ठेवता, ते सारे रुपये तुमच्यासमोर आकाशातून पडले आहेत का? किंवा ते सारे पैसे तुम्ही झाडाचे तोडून मल्टीस्टेट मध्ये ठेवले आहेत का? म्हणूनच आम्ही मल्टीस्टेटच्या अध्यक्षांना एक महत्त्वाचं आव्हान करत आहोत. त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी आमचं हे आव्हान नक्कीच स्विकारावं.
मल्टीस्टेटचा ताळेबंद, तेरीज पत्रक, नफा तोटा पत्रक याबरोबरच मल्टीस्टेट पतसंस्थेचा सर्व आर्थिक लेखाजोखा आणि संचालक मंडळ त्यांची नावं, पत्ते फोन नंबर हे सारं कोणत्याही वर्तमानपत्रात किंवा संबंधित मल्टीस्टेट पतसंस्थेच्या फेसबुक पेजवर, मल्टीस्टेटच्या अधिकृत वेबसाईटवर दि. 31 मार्च 2024 ची सर्व आकडेवारी मल्टीस्टेटच्या अध्यक्षांनो, प्रसिद्ध कराच. ही सर्व कागदपत्रं ठेवीदारांना पाहण्यासाठी तुमच्या मल्टीस्टेट पतसंस्थेच्या नोटीस बोर्डवर दर्शनी भागात डकवा.
जाता जाता आम्ही आणखी एक प्रश्न उपस्थित करत आहोत. स्थानिक कलेक्टर जिल्हा उपनिबंधक या दोघांपैकी एक मल्टीस्टेटचे निवडणूक निर्णय अधिकारी असतात. पण गेल्या अनेक आर्थिक वर्षांत अहिल्यानगर जिल्ह्यातल्या किती मल्टीस्टेटच्या निवडणुका झाल्या, हे जरा मल्टीस्टेटचे अध्यक्ष स्पष्टपणे सांगू शकतील का?
तूर्तास इथंच थांबत आहोत. लवकरच भेटू, पुढच्या भागात, नव्या माहितीसह. ही वृत्तमालिका तुम्हाला कशी वाटली, मल्टीस्टेटकडून तुमच्यावर अन्याय झाला आहे का? मग हातावर हात धरून किती दिवस गप्प बसणार आहात? तुम्ही मिंधे, नकटे आहात का? विनाकारण कोणाला घाबरत आहात? मर्दानगी दाखवा आणि अन्याय करणाऱ्या मल्टीस्टेटच्या अध्यक्षांविरुद्ध संघटित होऊन आमच्याकडे या. आपण सर्व मिळून अन्याय करणाऱ्या मल्टीस्टेटच्या अध्यक्षांना वठणीवर आणू आणि ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, त्या सर्वांनाच न्याय मिळवून देण्यासाठी एकदिलाने प्रयत्न करु, धन्यवाद.