लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर
सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या कररुपी पैशांवर डल्ला मारण्याचं पाप सध्या सर्रासपणे केलं जात आहे. हे पाप करणाऱ्यांना जराशीही लाज वाटत नाही. निर्लज्जपणे हे सारं सुरु असताना कर भरणारे नागरिक आणि व्यापारी मात्र ‘मुकी बिचारी कुणीही हाका’, अशा पद्धतीने या भ्रष्टाचाराकडे डोळे उघडे ठेवून हतबलतेनं पाहत आहे. पुणे महापालिकेत हा प्रकार सुरू आहे.
या महापालिकेच्या सुरक्षा अधिकारी आणि अतिक्रमण विभागातल्या अधिकाऱ्यांमध्ये सध्या टोकाचा वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. या महापालिकेत संबंधित कामगारांकडून महिन्यातले 26 दिवस काम करून घेतले जातात. मात्र या कामगारांना तब्बल 40 दिवसांचा पगार दिला जात आहे. वरचा ‘मलिदा’ नक्की कोण खातंय, हाच खरा प्रश्न आहे. दरम्यान, या संदर्भात आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे.
या महापालिकेच्या अतिक्रमण विभागातले अभियंते आणि सुरक्षा अधिकारी यांच्यात थेट शिवीगाळ आणि एकमेकांना धक्काबुक्की करण्यापर्यंत वाद झाला आहे. अतिक्रमण विभागाचे कार्यकारी अभियंता सदानंद लिटके यांनी सुरक्षा अधिकारी राकेश वीटकर यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला. अतिक्रमण काढण्याच्या कारवाईप्रसंगी संबंधितांचा विरोध मोडून काढण्यासाठी सुरक्षा विभागात वर्षभरापूर्वी 33 सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
या 33 सुरक्षा रक्षकांना अतिक्रमण विभागासाठी ‘रिलिव्ह’ करा, अशी मागणी केली असता यासाठी थोडा वेळ लागेल, असं वीटकर यांनी सांगितलं. यावरून या दोघांमध्ये शिवीगाळ आणि धक्काबुक्की झाली. दरम्यान, काम 26 दिवसांचं आणि पगार मात्र 40 दिवसांचा. यामध्ये नक्की ‘मलई’ कोण खात होतं, याचा शोध महापालिका प्रशासन घेणार आहे.