बाळासाहेब शेटे पाटील
लोकपत न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
बीड जिल्ह्यातल्या साईराम मल्टीस्टेटमध्ये झालेल्या शंभर कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आर्थिक घोटाळ्यात अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संत भगवान बाबा मल्टीस्टेटचा चेअरमन मयूर वैद्य याला संशयित आरोपी करण्यात आलं आहे. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अद्यापही मल्टीस्टेटचा नंगानाच सुरुच असून अहिल्यानगर जिल्ह्यातली ‘ती’ नामांकित ‘..बाबा’ मल्टीस्टेट पोलिसांच्या रडारवर आहे. पोलिसांनी मनावर घेतलं तर या आर्थिक घोटाळ्यात संबंधित ‘..बाबा’ मल्टीस्टेटच्या अध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या या ‘..बाबा’ मल्टीस्टेटचा उदय मोठा गंमतीशीर आहे. एका राजकीय पक्षाच्या मोठ्या वजनदार नेत्यानं केलेल्या ‘मनी लँड्रिंग’ घोटाळ्यातले तब्बल 300 कोटी रुपये या ‘… बाबा’ मल्टीस्टेटच्या अध्यक्षानं हडपले आणि त्यातून या मल्टीस्टेटचा जन्म झाला. याच मल्टीस्टेटमध्ये कोट्यवधी रुपयांचा बनावट सोने घोटाळा उघडकीस आला होता. विशेष म्हणजे या प्रकरणी पोलिसांत गुन्हादेखील दाखल झाला होता. मात्र यामध्ये 50 लाख रुपयांत ‘सेटलमेंट’ झाल्याची जोरदार चर्चा आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात ठिकठिकाणी शाखा असलेल्या आणि तात्विक सुविचारांनी तुडुंब भरलेल्या भल्या मोठ्या कॅलेंडरमार्फत घराघरांत पोहोचलेल्या या ‘…बाबा’ मल्टीस्टेटमध्ये साईराम मल्टीस्टेटने 19 कोटी रुपयांच्या ठेवी ठेवल्या आहेत. त्या बदल्यात ‘..बाबा’ मल्टीस्टेटकडून 17 कोटी रुपयांचं साईराम मल्टीस्टेटला कर्ज देण्यात आलं आहे. कर्जाच्या या 17 कोटी रुपयांचा साईराम मल्टीस्टेटमध्ये आर्थिक घोटाळा झाला आहे.
अहिल्यानगरचा एका बांधकाम व्यावसायिकाने (बिल्डर) बिल्डरने कर्जासाठी ज्याची जमीन तारण म्हणून ठेवली आहे, तो जमीन मालक अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे.
साईराम मल्टीस्टेटचा मयूर वैद्य याचा भगवान बाबा मल्टीस्टेटशी व्यवहार झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. हा मयूर वैद्य मध्यंतरी एका ‘नाजूक’ प्रकरणातही अडकला होता. मात्र सेटलमेंट करुन कसा बसा तो बाहेर आला.
‘त्या’ बिल्डरने नगरी भाषेत केली दमबाजी…!
अहिल्यानगरजवळ असलेल्या बोल्हेगाव परिसरातल्या परदेशी आडनावाच्या इसमाची जमीन नगरच्या एका बिल्डरने विकसित करण्यासाठी घेतली होती. मात्र ती जमीन तारण ठेवून त्या जमिनीवर 11 कोटी रुपयांचा कर्ज काढलं होतं. मात्र व्याज असेल ते कर्ज 18 कोटी रुपयांपर्यंत गेलं. साईराम मल्टीस्टेटकडून त्या बिल्डरला तगादा सुरु होताच संबंधित बिल्डरने ‘नगरी भाषेत’ दमबाजी केल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
… म्हणूनच पुन्हा एकदा लवकरच सुरु करत आहोत… ‘..बाबा’ मल्टीस्टेटचा नंगानाच ही वृत्तमालिका …!
सुजाण वाचकहो, तुम्हाला आठवत असेलच मागे आम्ही ‘मल्टीस्टेटचा नंगानाच’ ही अनेक भागांची वृत्तमालिका सुरु केली होती. अर्थात त्या वृत्तमालिकेला तुमचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. तांत्रिक कारणांमुळे आम्ही ती वृत्तमालिका बंद केली. मात्र पतसंस्था आणि मल्टीस्टेटचा नंगानाच थांबायलाच तयार नाही. म्हणूनच आम्ही
पुन्हा एकदा लवकरच
‘..बाबा’ मल्टीस्टेटचा नंगानाच ही वृत्तमालिका
सुरु करत आहोत.