लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर
नेवासे तालुक्यातल्या सोनईजवळच्या श्रीरामवाडी (चिमटा) परिसरामध्ये सिंगल फेज विद्युत पुरवठा कमी दाबाने होत असल्याने ऐन उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. कमी वीज पुरवठा होत असल्याने थ्री फेज विद्युत पुरवठासुद्धा कमी दाबाने होत आहे . परिणामी विद्युत मोटारी चालत नसल्याने जनावराचे पाण्याविना हाल होत आहेत. येथील जनावरांना पाणी कसे पाजावे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, या सर्व प्रकाराला कंटाळून स्थानिक युवकांनी येत्या पाच दिवसांमध्ये वीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरणच्या सोनईतल्या कार्यालयावर जनावरांचा मोर्चा नेण्याचा इशारा दिला आहे.
मध्यंतरीच्या वादळाने येथील काही विद्युत पोल पडले होते. त्यामुळे येथील विद्युत पुरवठा लांडेवाडी फिडरमधून होत आहे. श्रीरामवाडी (चिमटा) हा भाग हा शेवटी (टेलला) आला असल्याने येथे विद्युत पुरवठा कमी दाबाने होत आहे.
यापूर्वी श्रीरामवाडी भाग हा सोनई सबस्टेशन मधून जोडला होता. त्यावेळेस विद्युत पुरवठा पूर्ण दाबाने होत होता. मात्र मुळा कारखान्याची विद्युत वाहिनीची तारा पडल्या असल्याने त्याला कमीत कमी दीड महिन्याला लागणार असल्याचे महावितरण कंपनीकडून सांगितले जात आहे. त्यामुळे घरातील फॅन व इतर काहीही चालत नसल्याने येथील नागरिकांना मोठ्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे.
वादळ होऊनसुद्धा महिना उलटत आला आहे. तरीही अजून एक ते दीड महिना लागू शकतो, असं वितरण कंपनीकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे येथील नागरीक महावितरण कंपनीवर दंडुका मोर्चा आणि जनावरांचा मोर्चा काढणार आहेत.
उन्हाळ्यामध्ये असले प्रकार वारंवार महावितरण कंपनीकडून या भागात होत आहेत. त्यामुळे सोनईच्या महावितरण कार्यालयावर आक्रमक मोर्चा नेण्यात आल्याचं युवक कार्यकर्ते अनिल निमसे, विजय आढाव, संतोष कलापुरे, सचिन कलापुरे, रामेश्वर गडाख, बंडू आढाव, संतोष येळवंडे, प्रणव दरंदले, बाळासाहेब बेलेकर, रोहिदास कोठवळ, दीपक निमसे, अक्षय निमसे, संकेत निमसे यांनी सांगितलं आहे.