लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यात सध्या नक्की काय चाललंय, याचा थांगपत्ता स्थानिक पोलिसांनादेखील लागलेला नाही. राहुरी तालुक्यातल्या तिळापूर इथल्या गरदरे कुटुंबात राहत असलेल्या महिलेला तिच्या घरी एकटी असल्याचं पाहून ११ जणांनी तलवारी, लोखंडी गज, लोखंडी पाईप, लाकडी दांड्यानं प्राण घातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तिच्या नवऱ्याला संपून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास सदर महिला तिच्या मुलासह घरामध्ये असताना किशोर धर्मा जाधव, दादाहरी सोपान रुठे, भीष्मराज सोपान रोठे, पांडुरंग दौलत जाधव, हरिभाऊ बबन जाधव, संदीप अण्णासाहेब जाधव, गौरव रोठे, शिवाधर्मा जाधव, राहुल वामन जाधव, अण्णा रामदास जाधव, आदिनाथ जाधव हे सदर महिलेच्या घरासमोर आले.
यातल्या काहींनी महिलेच्या नवऱ्याला शिव्या देत, कुठं आहे तुझा नवरा? त्याला आज सोडणार नाही, असं म्हणत आरडाओरड केली. त्याचवेळी त्या महिलेनं घराबाहेर डोकावून पाहिलं असता त्यातल्या हरी बबन जाधव, पांडू जाधव यांच्या हातात लाकडी दांडके, संदीप जाधव यांच्या हातात लोखंडी गज, दादा रोठे आणि किशोर जाधव यांच्या हातात तलवार दिसल्या. त्यामुळे ती महिला घाबरुन घरात पळून गेली.
त्यावेळी दादा रोठे आणि किशोर जाधव हे त्या महिलेच्या मागे घरात घुसले आणि दोघांनी सदर महिलेच्या हाताला धरुन तिला बाहेर ओढलं. सर्वांनी घरात घुसून तिच्या नवऱ्याला घरामध्ये शोधलं. मात्र तो मिळून आला नाही. दादा रोठे याने त्या महिलेच्या मुलाला घरात खेळत असताना त्याला लाथ मारली आणि सदर महिलेला घाणेरड्या प्रकारची शिवीगाळ केली.
ते तिथून जात असताना त्यांनी त्या महिलेला धक्का दिल्याने ती खाली पडली असता तिच्या गळ्यातलं सोन्याचे मंगळसूत्र गहाळ झालं असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे.
याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम कायदा 333, 189 (2), 191 (2), 190, 191 (3), 115 (2), 352, 324 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत.