लोकपत न्युज नेटवर्क / मंत्रालय प्रतिनिधी / मुंबई
शिवसेनेचे नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रीमंडळ विस्ताराच्या संदर्भात कठोर भूमिका घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्येष्ठ मंत्र्यांचा ‘पत्ता कट’ करून नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देण्याचा विचार उपमुख्यमंत्री शिंदे करत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
येत्या 16 डिसेंबर रोजी महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वीच मंत्रीमंडळाचा विस्तार होणं आवश्यक आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांच्या आतापर्यंतच्या कामकाजाचं मूल्यांकन करूनच मंत्रीपदं दिली जाणार असल्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी मंत्री दीपक केसरकर,
अब्दुल सत्तार,
तानाजी सावंत
यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा मंत्रालयाच्या परिसरात ऐकायला मिळत आहे.
शिवसेनेच्या संभाव्य मंत्रीमंडळात उदय सामंत, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, संजय शिरसाट ,भरत गोगावले, प्रकाश सुर्वे, प्रताप सरनाईक, राजेश क्षीरसागर, आशिष जैस्वाल, निलेश राणे आदींचा समावेश असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गृहखात्यासाठी आग्रह धरला आहे. मात्र भाजपने आतापर्यंत या संदर्भात शिवसेनेला कुठलाही हिरवा कंदील दिलेला नाही.