संपादकीय…!
प्रथमत: सर्वच निर्भिड आणि वास्तववादी लिखाण करणाऱ्या पत्रकारांना साष्टांग दंडवत…! उद्या दि. ६ जानेवारी हा कै. बाळशास्त्री जांभेकर यांचा स्मृतीदिन आणि देशभरातल्या तमाम पत्रकारांचा गौरवदिन. महाराष्ट्रातल्या अहिल्यानगरच्या दैदिप्यमान इतिहास असलेल्या शहरात गेल्या २६ वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आम्ही कार्यरत आहोत. पण पत्रकारदिनाच्या पूर्वसंध्येला पत्रकारितेचे जनक कै. बाळशास्त्री जांभेकर
यांची आम्ही खरं तर जाहीर माफी मागत आहोत. या माफीचं कारण असं आहे, की सध्याच्या डिजिटल युगातल्या सोशल मिडियाच्या जमान्यातल्या पत्रकारितेत ‘कॉपी’ आणि पेस्टच्या आयत्या पत्रकारितेमुळे आमच्यापैकी काहींची शोधपत्रकारिता संपली आहे.
या 26 वर्षांच्या पत्रकारितेतल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर विविध वृत्तपत्रं, इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि आता सोशल मिडियामध्ये आम्ही आमची शाब्दिक लढाई लढत आहोत. तरुण भारत, नवा मराठा, नगर टाइम्स, लोकयुग, देशदूत, लोकमत या विविध अग्रगण्य वृत्तपत्रांसह विशाल वार्ता, श्री न्यूज, नगर न्यूज लाईन, न्यूज टुडे, एन. टीव्ही अशा इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये आम्ही काम केलं. या प्रदीर्घ अशा प्रवासात अनेक मौलिक अनुभव आम्हाला आले. खूप काही शिकायला मिळालं. वरिष्ठांकडून अनेकवेळा कानपिचक्या आम्हाला ऐकाव्या लागल्या. ते सारं आमच्या भल्यासाठी होतं, हे आज आम्हाला कळतंय.
सर्वश्री सुहास देशपांडे, नंदकुमार सातपुते, शिवाजी शिर्के, नंदकिशोर पाटील, स्व. सुधीर मेहता, स्व. प्रकाश भंडारे, रामदास ढमाले, सुधीर लंके, अशोक सोनवणे आदी अभ्यासू, अनुभवी पत्रकारांच्या सानिध्यात आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. या सर्वांच्या साक्षीनं आम्हाला सांगावसं वाटतं, की हल्ली आमची शोध पत्रकारिता संपत चाललीय. आम्ही आळशी झालो आहोत.
जनसामान्यांच्या समस्यांना आम्ही वाचा फोडत असलो तरी वाचकांच्या नजरेला सहसा न पडणाऱ्या अनेक बाबी आमच्यापासून लपून राहिल्या आहेत, हे आम्ही मोकळ्या मनानं मान्य करतो. आमचं सुदैव असं, की गुगल या सर्च इंजिनच्या माध्यमातून आम्ही देशभरातल्या अनेक वाचकांपर्यंत पोहोचलो आहोत, थँक्स गुगल.
पत्रकारितेच्या या प्रवासात जनसामान्यांच्या खूप मोठ्या अपेक्षा आमच्याकडून आहेत. त्या अपेक्षांना प्रामाणिकपणे साथ देण्याची आमची तयारी आहे. आमचा तसा प्रयत्नही असतो. मात्र यासाठी कायदेशीर बंधनं येत असल्यामुळे आम्ही अनेकांच्या समस्यांना कधी कधी जाहीरपणे प्रसिद्धी देऊ शकत नाही. कारण आम्ही जी समस्या मांडणार आहोत, त्यासाठी पुराव्यांची आवश्यकता असते. नेमकं तेच देण्याचं अनेकजण टाळताहेत. दुर्दैवाची बाब अशी, या पुराव्यांअभावी आम्ही कधी कधी बातमी द्यायला असमर्थ ठरतो.
या लेखाच्या माध्यमातून आम्ही सर्वांना असं जाहीर आवाहन करु इच्छितो, की तुमच्या जीवनात जर काही समस्या असतील, सरकारी यंत्रणांकडून तुम्हाला त्रास दिला जात असेल तर पुराव्यानिशी आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा नक्की प्रयत्न करु. तूर्तास इतकंच. पुन्हा एकदा सर्व निर्भिड आणि वास्तववादी लिखाण करणाऱ्या पत्रकारांसह ‘लोकपत’च्या लाखो वाचकांना उद्याच्या पत्रकारदिनानिमित्त अंत:करणपूर्वक शुभेच्छा…! आम्हाला तुम्ही आतापर्यंत दिलेल्या भक्कम साथसंगतीबद्दल तुमचे मनापासून आभार. यापुढेही तुमची अशीच भक्कम साथ आणि मौलिक मार्गदर्शन मिळेल, अशी अपेक्षा करत आहोत, धन्यवाद.