लोकपत न्युज नेटवर्क / मुंबई
कोण म्हणतं अडीच वर्षांचा टप्पा करा, कोण म्हणतं दोन + दोन + एक असा टप्पा करा. अर्थात राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी अडीच वर्षे काय किंवा दोन + दोन + एक असा फॉर्म्युला कुठलाच फॉर्मुला राहणार नाही. सलग पाच वर्षांसाठी एकच मुख्यमंत्री राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. परंतू मुख्यमंत्रीपदासाठी नक्की कोणाचं नाव पुढं केलं जातंय, याचीच उत्सुकता आता राज्यभरातून व्यक्त केली जात आहे.
साहजिकच भाजपच्या जास्त जागा असल्यामुळे अडीच वर्षांसाठी भाजपचा मुख्यमंत्री करण्यात यावा, अशी मागणी पक्षाच्या आमदारांनी केली आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री पदासाठी दोन वर्षे एकनाथ शिंदे
दोन वर्षे देवेंद्र फडणवीस
आणि उर्वरित एका वर्षासाठी अजित पवार
यांना मुख्यमंत्री करण्यात यावं, अशी मागणी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमधून केली जात आहे.
दरम्यान, असा कुठलाच ‘फॉर्म्युला’ अस्तित्वात येणार नसून सलग पाच वर्षांसाठी एकच मुख्यमंत्री राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्री कोण किंवा मुख्यमंत्रीपदासाठी कोणता फॉर्म्युला आहे, हा प्रश्न महत्त्वाचा नसून राज्याचा सर्वच क्षेत्रांमध्ये अखंडित विकास व्हावा, राज्याचं दरडोई उत्पन्न वाढावं, असा उद्देश असल्याचं या निमित्तानं सांगितलं जात आहे. येत्या एक ते दोन दिवसांत मंत्रीमंडळ स्थापन होऊन राज्याला पुन्हा एकदा नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. परंतू एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस, या प्रश्नाचं उत्तर मात्र सध्या तरी अनुत्तरितच आहे.