लोकपत न्यूज नेटवर्क / पाथर्डी / प्रतिनिधी
राज्यातल्या सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी मागच्या महायुती सरकारने कौशल्य विकास मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली होती. या योजनेत युवक – युवतींना सहा महिन्यांसाठी प्रशिक्षणार्थी म्हणून घेण्यात आलं होतं. या कालखंडामध्ये संबंधित युवक-युवतींना शासकीय कामांचा चांगला अनुभव आला आहे. त्यामुळे या युवक – युवतींना पुन्हा बेरोजगारीच्या खड्ड्यात न ढकलता शासकीय योजनेत कायम करावं, अशा आशयाचं एक निवेदन पाथर्डी – शेवगावच्या आमदार मोनिका राजळे यांना देण्यात आलंय.
या निवेदनात म्हटलं आहे, की या युवक – युवतींना भविष्यात होणाऱ्या सरळ सेवा भरतीत प्रथम प्रधान देण्यात यावं. या युवक युवतींचं कायमस्वरूपी समायोजन होईपर्यंत सध्या ते जिथं आहेत, तिथंच कंत्राटी कर्मचारी म्हणून त्यांची सेवा कायम करण्यात यावी. या युवक – युवतींना शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आकस्मिक रजा, वैद्यकीय रजा, प्रवास भत्ता तसेच वेतन अदा करण्यात यावं.
या निवेदनावर नेहा जाधव, ऋतुजा खंडागळे, सिद्धी भवर, अश्विनी गुजर, सायली भराट, शितल राऊत, स्वाती सुतार, राजेंद्र अभंग, रविंद्र बोरुडे आदींच्या सह्या आहेत.