लोकपत न्यूज नेटवर्क / मुंबई
महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यात असलेल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. हल्लेखोरांनी मयत देशमुख यांच्यावर रॉडने 350 वार करुन त्यांचे हाल हाल केले होते. विशेष म्हणजे मयत सरपंच देशमुख यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली होती. या अमानुष हत्याकांडाला दोन महिने आणि सहा दिवस पूर्ण झाले आहेत. खंडणी आणि हत्येचा आरोप ज्यांच्यावर आहे, ते जवळपास सर्वच आरोपी जेरबंद करण्यात आले आहेत. मात्र या हत्याकांडातला कृष्णा आंधळे हा फरार आरोपी अद्यापपर्यंत पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात अनेक प्रकारच्या प्रश्नांनी काहूर माजलं आहे. या अनुषंगानं उपस्थित होत असलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्याची खरी जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते राज्याचे या मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांना उद्देशून महाराष्ट्रातली जनता, कुठं लपलाय कृष्णा आंधळे? फडणवीस साहेब, हे तुमच्या गृहविभागाचं अपयश नाही का? मयत संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना या जन्मात तर न्याय मिळेल का? असे प्रश्न विचारत आहे.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सांगताहेत, की मुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस हे संवेदनशील मनाचे नेते आहेत. मयत संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातल्या प्रत्येक आरोपींना कठोर शिक्षा केली जाईल. यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा सहभाग आढळून आल्यास मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे यासंदर्भात योग्य निर्णय घेतील. मात्र या हत्याकांडातला फरार आरोपी कृष्णा आंधळे याला कधी अटक होणार, या हत्याकांडातल्या सर्वच आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र कधी दाखल होणार, फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करण्यासाठी आतापर्यंत कोण कोणते प्रयत्न करण्यात आले, त्याला तपास अधिकाऱ्यांनी फरार असं घोषित का केलं नाही आणि फरार घोषित केलं असल्यास फरार झालेल्या आरोपी आंधळेला अटक करण्यासाठी राज्याचा गृह विभाग नक्की काय प्रयत्न करणार, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ना बावनकुळे यांच्याकडे आहेत, ना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडवणीस यांच्याकडे आहेत. तर मग अशा परिस्थितीत आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत नसेल कशावरुन? मात्र राज्यातल्या जनतेला जे कळायचं ते कळून चुकलं आहे.
महाराष्ट्र पोलीस दलातले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे वेळप्रसंगी पुरलेले, सडलेले मृतदेह उकरुन काढतात. आरोपी कितीही चलाख, धूर्त असला तरी राज्याची पोलिस यंत्रणा त्या आरोपीपर्यंत कसल्याही परिस्थितीत पोहोचतेच. मात्र राज्याच्या या पोलीस दलाला चकवा देण्यात कृष्णा आंधळे हाच एकमेव आरोपी आजपर्यंत कशा पद्धतीने यशस्वी झाला, कृष्णा आंधळे बेपत्ता होण्यामागे कोण कोण ‘मास्टरमाईंड’ आहेत, कृष्णा आंधळे सध्या देशात आहे की परदेशात, लपून बसण्यासाठी कृष्णा आंधळेला नक्की कोण मदत करत आहे आणि या जन्मात तरी पोलिसांना कृष्णा आंधळे सापडणार का, या आणि अशा अनेक प्रश्नांच्या उत्तराची महाराष्ट्रातली तमाम जनता वाट पाहत आहे, हे राजाचे संवेदनशील मनाच्या मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायमस्वरुपी लक्षात ठेवायलाच हवंय.