लोकपत न्यूज नेटवर्क / नेवासा / प्रतिनिधी
मुळा धरणातून शेतीच्या पाण्याचं आवर्तन सोडण्यात यावं, यासाठी अनेक शेतकरी बांधवांचे फोन येत आहेत. या संदर्भात मंत्रालयात एका बैठकीतही हा विषय घेण्यात आला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे
यांच्यादेखील कानावर हा विषय टाकला आहे. पाटपाण्याच्या आवर्तनासंदर्भात आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू असून लवकरच मुळा धरणातून शेतीच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात येईल, अशी माहिती स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे
यांनी ‘लोकपत’ न्यूज नेटवर्कशी बोलताना दिली.
आमदार लंघे यांनी सांगितलं, की काही ठिकाणी दुरुस्तीची कामं सुरू असल्यामुळे आवर्तन सोडण्यास उशीर होत आहे. आवर्तन सोडण्याची सरकारची डेटलाईन लांबची होती. मात्र ती अलीकडे घेण्यात आली असून सरासरी आठ ते दहा दिवसांत मुळा धरणातून आवर्तन सुरू होईल.
चाऱ्या आणि पोटचाऱ्यांची दुरुस्ती अत्यावश्यक…!
वस्तुस्थिती अशी आहे, नेवासा तालुक्यात ठिकठिकाणी चाऱ्या आणि पोटचाऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. परिणामी आतापर्यंतच्या प्रत्येक आवर्तनात लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आलेली आहे. यावर्षी सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाल्यामुळे मराठवाड्याला पाणी देण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे एक आवर्तन जास्त येणार आहे. मात्र पाण्याची नासाडी होऊ नये, यासाठी चाऱ्या आणि पोटचाऱ्यांची दुरुस्ती करणं गरजेचं झालं आहे.