लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर
गेल्या 14 दिवसांपूर्वी म्हणजे दि. 02/ 06/ 2025 रोजी प्रमोद रामदास घोडके (रा. दत्तमंदीर शेजारी, ढवणवस्ती, तपोवन रोड, अहिल्यानगर) हा तरुण डोकेदुखीची गोळी आणण्यासाठी गेला असता आरोपींनी त्याला बोलवून घेत तु ऋषी ढवण याच्यासोबत का राहतो, अशी विचारणा करत शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भिमराज आव्हाड याने त्याच्या हातातल्या पिस्टलमधून दोन राऊंड फायर केले होते. सदर घटनेबाबत तोफखाना पोलीस ठाणे गु.र.नं. 593/2025 बी. एन. एस. 2023 चे कलम 109(1), 115(2), 352, 189 (2) (4), 191 (2)(3), सह आर्म ऍ़क्ट कलम 3/25, 27 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या गुन्ह्यातल्या 3 आरोपींना तोफखाना पोलीस स्टेशन यांनी अटक केलेले होते. परंतू सदर गुन्ह्यातला मुख्य सूत्रधार गुन्हा घडल्यानंतर पळून गेलेला होता. अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सदर गुन्ह्यातले आरोपी अटक करणेबाबत आदेश दिले.
त्या आदेशाच्या अनुषंगाने पोनि. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि तपास पथकातले पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार संदीप पवार, अतुल लोटके, अशोक लिपणे, संदीप दरंदले, विशाल तनपुरे, फुरकान शेख, प्रशांत राठोड, उमाकांत गावडे यांचे पथक तयार करुन गुन्ह्यातल्या आरोपींचा शोध घेणेकामी पथकास रवाना केलं होतं.
दरम्यान, काल अर्थात दिनांक 15/ 06/ 2025 रोजी पथक गोपनीय माहितीचे आधारे आरोपींचा शोध घेत असतांना आरोपी नामे भिमराज आव्हाड आणि राहुल विजय सांगळे हे दोघे केसनंद, (ता. जि. पुणे) या ठिकाणी येणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने पुणे या ठिकाणी जाऊन तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपींचा शोध घेतला.
यादरम्यान आरोपी भिमराज गेणुजी आव्हाड (वय 58 वर्षे, रा. नित्यसेवा, पाईपलाईन रोड, अहिल्यानगर) आणि राहुल विजय सांगळे (वय 33 वर्षे, रा. शिवनगर, सावेडी, ता. जि. अहिल्यानगर) हे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आलं.
आरोपी भीमराज गेणुजी आव्हाड याचेविरुध्द यापुर्वी मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल असून तो सदर गुन्ह्यातून जामीनावर आहे. तसेच आरोपी नामे राहुल विजय सांगळे याचेविरुध्द दंगा, मारहाणीचे 2 गुन्हे दाखल आहेत.
ताब्यातल्या आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलं असुन पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर आणि अमोल भारतीे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर उपविभाग यांचे सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी तसेच अंमलदार यांनी केली.