लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
नेवासे तालुक्यातल्या सोनईजवळ असलेल्या हनुमानवाडी परिसरात झिने यांच्या ऊसात आज (दि. ८) दुपारी एकच्या सुमारास बिबट्याची मादी आणि तिच्या तीन बछड्यांचं वास्तव्य आढळून आलं. त्यामुळे या परिसरातल्या शेतकरी बांधवांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
झिने यांच्या ऊसाच्या शेतात ऊस तोडणी कामगारांना हे तीन बछडे आढळून आले. काही ऊस तोडणी महिलांनी त्या बछड्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करताच बिबट्याची मादी त्या महिलांवर गुरगुरली. घाबरलेल्या ऊस तोडणी कामगारांनी ऊसाच्या फडातून ताबडतोब गाड्या काढत कारखान्याकडे धाव घेतली.
यासंदर्भात अहिल्यानगर वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता काही वेळाने वनविभागाचे अधिकारी सिसोदे आणि इतरांनी झिने यांच्या ऊसात पाहणी केली. परंतू त्याठिकाणाहून बिबट्याच्या मादीची बछडे आणि मादी गायब होती. तिने कदाचित शेजारच्या ऊसात पळ काढला असावा, असा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय.
शेतकरी बांधवांनो, काळजी घ्या…!
नेवासे तालुक्यात अनेक ठिकाणी शेकडो एकर ऊसाचे फड आहेत. या ऊसात बिबट्याच्या मादीला लपण्यासाठी भरपूर जागा आहे. तिच्या बछड्यांना जर कोणी हात लावला तर बिबट्याची मादी संबंधितांवर हल्ला करु शकते. ज्याठिकाणी ऊस तोडणी काम सुरु आहे, त्या ऐवजी दुसऱ्या बाजूने ऊस तोडणी करावी. लहान मुलांना त्या ठिकाणी जाऊ देऊ नये. जास्तीत जास्त फटाके वाजवावेत. ऊस पेटवून दिल्यास बिबट्याची मादी आणि तिच्या बछड्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस पेटवून देऊ नये. अशाप्रकारे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी, असं आवाहन लोकपत न्यूज नेटवर्क अँड लोकपत यूट्यूब चॅनल त्याचप्रमाणं अहिल्यानगर वनविभागाच्यावतीनं करण्यात येत आहे.