लोकपत न्यूज नेटवर्क
मंत्रालय प्रतिनिधी / मुंबई
राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मंजूर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीवरून राज्यपालांनी मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला आहे. आज सकाळी धनंजय मुंडेंनी आपला राजीनामा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला होता.
विशेष म्हणजे, त्याआधी सोमवारी संध्याकाळी मयत सरपंच संतोष देशमुख
यांच्या हत्येच्यावेळीचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा फैसला झाला होता.
दरम्यान, ‘बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतल्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झालं, असं धनंजय मुंडे
म्हणाले आहेत.
या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसंच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरुन आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तवसुद्धा मी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.
सरकार मुंडेंना सहआरोपी करणार का?
धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी स्विकारला आहे. या घडामोडीनंतर राज्यात आता वेगळीच मागणी होत आहे. धनंजय मुंडे यांची वाल्मीक कराड याच्याशी जवळीक असल्याचं बोललं जात असून मुंडे यांनीही ते मान्य केलं आहे. अशा परिस्थितीत मंत्रीपदाचा राजीनामा दिलेल्या धनंजय मुंडे यांना मयत सरपंच देशमुख यांच्या हत्याकांडात राज्य सरकार सह आरोपी करणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागलं आहे.