लोकपत न्यूज नेटवर्क / मुंबई
बीडच्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागे वाल्मीक कराड हाच ‘मास्टरमाईंड’ असल्याचा दावा आमदार सुरेश धस यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी यापूर्वी केलेला आहे. पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन कोटी रुपये खंडणी मागितल्याचा आरोपदेखील कराड याच्यावर आहे. याप्रकरणी कराड सीआयडी पोलिसांना शरण आलेला आहे. मात्र बीड जिल्ह्यातल्या लाडकी बहीण योजनेचा सर्वेसर्वा म्हणून वाल्मीक कराड याचं नाव आजही झळकत आहे. राज्यात नक्की चाललंय काय, राज्य सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, असा संतप्त सवाल या निमित्तानं उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेसाठी द्यायला राज्य सरकारकडे पैसे आहेत. पण न्यायमूर्तींच्या पगारासाठीच राज्य सरकारकडे पैसे उपलब्ध नाहीत का, असा सवाल उपस्थित करत उच्च न्यायालयानं राज्य सरकारचे कान टोचले आहेत. बीडच्या केज तालुक्यात असलेल्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष आणि निर्घृण हत्याकांडामुळे राज्यात सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मात्र या हत्याकांडात ज्याचं नाव आघाडीवर आहे, त्या वाल्मीक कराडचं बीड जिल्ह्यातल्या लाडकी बहीण योजनेवर अद्यापही नाव झळकत आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली आहे.
राज्य सरकारचा कारभार ‘आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय’ अशा प्रकारातला असल्याची टीका जनसामान्यांमधून केली जात आहे. या निमित्ताने बीड जिल्ह्याच्या जिल्हा प्रशासनाची बेजबाबदारवृत्ती पाहायला मिळत आहे. लाडकी बहीण योजनेवरचं वाल्मीक कराड याचं नाव आतापर्यंत का हटविण्यात आलं नाही, यानंतरही कराडचं नाव त्या समितीवरून कधी हटविण्यात येणार, असे अनेक प्रश्न सध्या चर्चिले जात आहेत.
या प्रकरणाला जातीय रंग नकोच…!
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बीड जिल्ह्यातले दोन समाज सध्या रडारवर आहेत. या दोन समाजामध्ये खूपच दुश्मनी असल्याचं खोटं चित्र रंगवलं जात आहे. मात्र याला काहीच अर्थ नाही. या दोन्ही समाजाचे संपूर्ण लोक या प्रकरणात नक्कीच सहभागी नाहीत. खरं तर मयत देशमुख यांच्या कुटुंबियांमागे संपूर्ण राज्यातील जनता उभी आहे. त्यामुळे विशिष्ट समाजाची लोकंच त्यांच्या पाठीमागे आहेत आणि दोन समाजामध्ये प्रचंड आग धुमसत आहे, असं खोटं चित्र विनाकारण रंगवलं जात आहे. देशमुख हत्याकांडाच्या प्रकरणाला कोणीही जातीय रंग देण्याचा अजिबात प्रयत्न करु नये. यामध्ये माणुसकीला प्राधान्य देण्यात यावं, अशीच या राज्यातल्या सर्व जनतेची अपेक्षा आहे.