लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
नेवासे तालुक्यातल्या सोनईनजिकच्या धनगरवाडी शिवारातून रात्री अपरात्री बेसुमार मुरुमाचा उपसा सुरु आहे. या शिवारात पाझर तलाव असून त्या पाझर तलावा शेजारीच मुरुमाची तस्करी सुरु आहे. या मुरुमाची तस्करी करणारा कोण आहे, या मुरुम तस्कराला कोणाचा वरदहस्त आहे, आतापर्यंत या शिवारातून किती ब्रास मुरुमाचं उत्खनन करण्यात आलंय, याची संबंधितांनी महसूल यंत्रणेकडे रॉयल्टी भरली आहे का, मध्यरात्री उशिरापर्यंत या मुरुमाची तस्करी सुरु असताना नेवासाचे तहसीलदार, तलाठी मंडळ अधिकारी, संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हे सारे झोपले आहेत का, असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
सोनईचे सामाजिक कार्यकर्ते संजय वैरागर यांनी या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु केला आहे. संघटनेच्या माध्यमातून लवकरच ते राज्याचे महसूल मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी या सर्वांना निवेदन देणार आहेत. नेवाशाच्या महसूल यंत्रणेनं या ठिकाणच्या मुरुमाची अज्ञात इसमाकडून तस्करी करण्यात येत असल्यास म्हटलं आहे. मात्र हा अज्ञात इसम कोण आहे, राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे का, या प्रश्नांची उत्तरं नेवाशाच्या जनतेला मिळायलाच हवी आहेत. नेवाशाच्या झोपलेल्या महसूल यंत्रणेला खडबडून जाग यावी, घ्यावी अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त केली जात आहे.
व्हिडिओ क्रेडिट :
किशोर दरंदले, सोनई.