लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
‘दुनिया झुकती हैं, झुकानेवाला चाहिए’, ही म्हण तुम्ही यापूर्वी अनेक वेळा ऐकले असेल. मात्र ही म्हण तंतोतंत खरी करुन दाखविण्याची किमया अहिल्यानगर तालुक्यातल्या रांजणी माथणी या गावातल्या लबाड, बोलघेवड्या संदीप थोरात आणि त्याच्या सहकाऱ्यांनी करुन दाखवली आहे. शेवगाव तालुक्यातल्या वरुर चौफुला, आखेगाव रोड या परिसरात संदीप थोरात याने क्लासिक ब्रिज मनी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी या नावाने शेअर मार्केटची शाखा स्थापन केली.
या शाखेत आर्थिक गुंतवणूक केल्यास दर महिन्याला पंधरा टक्के परतावा (रिटर्न्स) देण्यात येईल, अशी आकर्षक जाहिरात असलेले हजारो पत्रकं (पॉम्पलेट्स) छापून ती घरोघर वाटली. संदीप थोरात हा आधीच बोलघेवडा इसम, त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदारावर त्याने अशी काही जादू टाकली, की गुंतवणूकदार कुठलीही शहानिशा न करता एका क्षणात लाखो नव्हे तर कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करायला तयार झाले.
या गुंतवणूकदारांमध्ये गोरख सिताराम वाघमारे हा 63 वर्षीय चप्पल दुकानदार संदीप थोरातच्या गोड बोलण्याला भूलला आणि दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी या सर्वसामान्य चप्पल विक्रेत्याने संदीप थोरात याच्या क्लासिक ब्रिज मनी सोल्युशन या शेअर मार्केटच्या शाखेत एक वर्षाच्या मुदतीवर तब्बल पाच लाख रुपये गुंतविले. विशेष म्हणजे या गुंतवणूकदाराचा विश्वास संपादन करण्यासाठी संदीप थोरात यांनी वकिलामार्फत तब्बल 1 हजार रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करुन दिली.
संदीप सुधाकर थोरात, दीपक रावसाहेब कराळे हे दोन संचालक आणि यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल सिताराम खरात (नाशिक) शेवगाव संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप तात्याभाऊ कोरडे, संस्थेचे दोन कर्मचारी नवनाथ सुभाष लांडगे आणि सचिन सुधाकर शेलार या सर्वांनी चप्पल विक्रेते गोरख सिताराम वाघमारे यांना अत्यंत विश्वासपूर्वक संस्थेची माहिती दिली.
दिनांक एक जून 2024 रोजी गोरख वाघमारे यांचा वाढदिवस आणि त्यानिमित्तानं त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं. त्या दिवशी सचिन शेलार हे गुंतवणूकदारांना परतावा (रिटर्न्स) देणार असल्याचे सांगण्यात आल्यामुळे चप्पल विक्रेते गोरख वाघमारे हे सायंकाळी पाच वाजता आवर्जून क्लासिक ब्रिज मनी सोल्युशन या शेअर मार्केट शाखेच्या कार्यालयात गेले. परंतु दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान या संस्थेच्या कार्यालयावर जीएसटी कार्यालयाचा छापा पडल्याचं वाघमारे यांना सांगण्यात आलं. वास्तविक पाहता जीएसटी कार्यालयाचा असा कुठलाही छापा क्लासिक ब्रिज मनी सोल्युशन या कार्यालयावर पडलाच नव्हता. परंतू बोलघेवड्या आणि ‘खोटं बोल पण रेटून बोल’, या स्वभावाच्या संदीप थोरातने चप्पल विक्रेते गोरख वाघमारे यांच्यासह अनेकांना कोटी रुपयांचा गंडा घातला. एकट्या वाघमारे यांची यामध्ये तब्बल 23 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यांना न्याय मिळेल का, हा प्रश्न मात्र सध्या तरी अनुत्तरीतच आहे.