लोकपत न्यूज नेटवर्क / नेवासा / प्रतिनिधी
नेवासे तालुक्यातल्या कांगोणी परिसरात असलेल्या रौंदळ वस्तीजवळ एका ओढ्यात अनेक दिवसांपासून ठरवून दिलेल्या परवान्यापेक्षा जास्त प्रमाणात वाळू उपसा सुरु असल्याच्या तक्रारी स्थानिक ग्रामस्थांमधून करण्यात आल्या होत्या. यासंदर्भात अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातही
लेखी तक्रार करण्यात आली. त्या तक्रारीची
सविस्तर बातमी लोकपत न्यूज नेटवर्कने
प्रसारित केली होती.
या बातमीची नेवाशाचे तहसीलदार संजय बिरादार यांनी गांभीर्यानं दखल घेतली. ज्या परिसरात वाळू उपसा करण्यात आला, त्या परिसराचं भूमी अभिलेख विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मोजमाप करण्यात आलं आणि त्यानंतर तहसीलदार बिराजदार यांच्या आदेशानुसार सदर वाळू उपसा बंद करण्यात आला.
दरम्यान, वाळू उपसा करण्यात आलेल्या या परिसराचं मोजमाप करण्यात आलं असून त्याचा अहवाल भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी नेवाशाच्या तहसील कार्यालयात पाठविणार आहेत. तहसीलदार कार्यालयातून तो अहवाल अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवला जाणार आहे. या अहवालानुसार नेवासे तालुक्यातल्या कांगोणी परिसरात वाळू उपसा करणाऱ्या इसमांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध किती दंड आकारला जातो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून भूमी अभिलेख कार्यालयाच्या मोजणी अहवालाची अनेकांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.