संपादकीय…!
सुजाण आणि सजग वाचकहो, सप्रेम नमस्कार. ‘लोकपत’ हे ऑनलाईन बातमीपत्र आपल्या स्मार्टफोनमध्ये व्हायरल करताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे. पत्रकारितेतल्या २६ वर्षांच्या सोबतीला असतांना विविध प्रकारच्या आमच्या बातम्या आणि लिखाणाचं तुम्ही नेहमीच कौतूक केलंय. काही वेळा आम्ही चुकलो तरी आमच्या चुकांवर पांघरुण घालत तुम्ही नेहमीच आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात. यापुढील काळात ‘लोकपत’ अन्यायग्रस्तांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या अन्यायाला वाचा फोडत असताना सर्वसामान्यांची लोकप्रतिष्ठा जपण्याचं व्रत ‘लोकपत’ न्युज नेटवर्क अखंडपणे जपणार आहे. किंबहुना तसं व्रतच आम्ही घेतलं आहे.
सर्वसामान्यांची लोकप्रतिष्ठा जपत असताना समाजातल्या वाईट प्रवृत्तींवर कठोरपणे शाब्दिक प्रहार करायला आम्ही अजिबात मागेपुढे पाहणार नाही. अन्यायग्रस्त नागरिकांनी पुराव्यासह आमच्याकडे तक्रारी केल्यास संबंधितांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत बातमीच्या आम्ही माध्यमातून पाठपुरावा करणार आहोत.
हे करत असताना आमच्याकडून कोणी तरी दुखावलं जाणार, आमच्याबद्दल नाराजी पसरणार, नाराज झालेल्यांकडून आम्हाला साम, दाम, दंड आणि भेद अशा प्रकारची ‘भेट’ देण्याचा प्रयत्न केला जाणार, याची आम्हाला पूर्णतः खात्री आहे. मात्र कोणाच्याही फुकटच्या पैशांची आम्हाला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसल्यानं आमच्यावर नाराज झालेल्यांची ही ‘भेट’ आम्ही सहजासहजी लाथाडून लावू शकतो, असा आम्हाला आत्मविश्वास आहे.
‘लोकपत’ हे ऑनलाईन बातमीपत्र केवळ बातम्या देण्यावरच थांबणार नाही. तर ‘इन्फोटेन्मेंट’ या तत्त्वानुसार माहिती आणि मनोरंजन अशा दोन बाजू सुजाण वाचकांना
सक्षमपणे देण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.
बातमीपत्र म्हटलं, की त्यामध्ये जाहिरातीची व्यावसायिक बाजू आलीच. कारण यावरच जमा आणि खर्चाची तोंडमिळवणी आम्हाला करता येणार आहे.
‘लोकपत’ हे बातमीपत्र एका तालुक्यापुरतं, जिल्ह्यापुरतंच मर्यादित नसून या बातमीपत्राला अमर्याद कक्षा आहेत. ज्याच्याकडे स्मार्टफोन आहे, त्या प्रत्येकाला ‘लोकपत’ हे बातमीपत्र वाचता, पाहता आणि ऐकता येणार आहे.
व्यावसायिक बांधवांना आमची नम्र विनंती आहे, की आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आपण आम्हाला कधीही संपर्क करा. आपल्या सर्वांच्या पाठबळावर गेल्या 26 वर्षांच्या पत्रकारितेत आम्ही यशस्वीपणे वाटचाल करत आहोत. यापुढे आम्हाला आपले असेच आशिर्वाद अखंडपणे राहतील, असा विश्वास व्यक्त करुन थांबतो आहोत. पुनश्च एक वार आपणांस अंत:करणपूर्वक धन्यवाद.